आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's 'third Front' Seeks To Shake Up Politics News In Marathi

11 पक्षांची तिसरी आघाडी स्थापन; निवडणूक एकत्र लढवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा घणाघात करत 11 पक्षांनी एकत्र येऊन तिसर्‍या आघाडीची मोट बांधली. मंगळवारी याची औपचारिक घोषणा करण्यात आली. आघाडीतील पक्षांनी लोकसभेची निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्धार व्यक्त केला, मात्र त्यांच्याकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.

तिसर्‍या आघाडीमध्ये डाव्या पक्षांव्यतिरिक्त समाजवादी पार्टी, जनता दल युनायटेड, जनता दल धर्मनिरपेक्ष, अण्णाद्रमुक, बिजु जनता दल, आसाम गण परिषद आदींचा समावेश आहे. मंगळवारच्या पत्रकार परिषदेवेळी बिजद आणि एजीपीचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी बिजद प्रमुख नवीन पटनायक पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकले नसल्याचे कारण दिले. आसाम गण परिषदेचे प्रमुख प्रफुल्लकुमार महंत यांच्या आईची प्रकृती बरी नसल्याने ते येऊ शकले नाहीत. दोघे आले नसले तरी त्यांचे पक्ष आमच्यासोबतच असल्याचा दावा करात यांनी केला. पत्रकार परिषदेआधी घटक पक्षांतील मुलायमसिंह यादव, नितीशकुमार, एच.डी. देवेगौडा, प्रकाश करात, ए.बी. वर्धन, सीताराम येचुरी, एम.थम्बीदुराई व अन्य नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये तिसरी आघाडी रालोआ आणि संपुआपेक्षा चांगली असल्याचा दावा केला. काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप त्यांनी केला.

बैठकीनंतर एका प्रश्नावर सपप्रमुख मुलायम म्हणाले, पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल. या आघाडीला बहुमत मिळो अथवा नाही, तिसरी आघाडी काँग्रेस व भाजपशी कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले. याला थर्ड फ्रंट म्हणू नका, खरे तर हे फ्रंट फ्रंट आहे, असे जदयू अध्यक्ष शरद यादव म्हणाले.

लालूंचे लोजपला आवाहन
राजदप्रमुख लालू प्रसाद यादव यांनी लोजपा प्रमुख रामविलास पासवान यांना आघाडी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. लालू म्हणाले, मी पासवान यांच्या संपर्कात आहे. मात्र, ते मुंबईला गेले असल्याचे मला सांगण्यात आले. माझ्याशी खोटे बोलले जात आहे, पण मी तो अवमान समजत नाही. पासवान यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी करू नये, असे माझे त्यांना आवाहन आहे. आपण काही नेत्यांना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले आहे, असे लालू म्हणाले

पासवान रालोआच्या वाटेवर
लोकजनशक्ती पार्टीचे (लोजपा) नेते रामविलास पासवान यांच्याशी आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याची कबुली भाजपने पहिल्यांदाच दिली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी बुधवारी दिल्लीत येत असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता एका वृत्त वाहिनीने केली आहे. भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले, भाजप ‘लोजपा’शी जागा वाटपाबाबत चर्चा करत आहे. राजकारण शक्यतांचा खेळ असतो. चर्चेतून फलनिष्पत्ती झाल्यास त्याची माहिती दिली जाईल. बिहार भाजपतील काही नेत्यांचा विरोध आहे काय? यावर असा कोणताही विरोध नाही. आम्ही सर्व निर्णय विचारांती घेतो, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस संपर्कातील पक्षांशी आघाडी नाही
भाजप काँग्रेसच्या संपर्कात असलेल्या कोणत्याही पक्षाशी आघाडीबाबत चर्चा करणार नाही, अशी भूमिका भाजपचे प्रदेश प्रभारी मुरलीधरन राव यांनी व्यक्त केली. विजयकांत यांचा डीएमडीके, एमडीएमके आणि पीएमके यांच्या व्यतिरिक्त काही छोट्या पक्षांशी भाजप चर्चा करत आहे. केद्रातील सरकार स्थापनेत या राज्याचाही वाटा असावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे मुरलीधरन म्हणाले.