आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indira Gandhi Not Knew Emergency Provision President Pranav Mukerjee

आणीबाणीच्या तरतुदीच इंदिराजींना माहित नव्हत्या, राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून उलगडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात आणीबाणी लागू करण्यासंबंधी घटनात्मक तरतुदींची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना माहितीच नव्हती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या 'द ड्रॅमॅटिक डिकेड : द इंदिरा गांधी इयर्स' या पुस्तकातून हा उलगडा झाला आहे. शिवाय, आणीबाणी लागू करण्याचा सल्ला प. बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर राय यांनीच इंदिराजींना दिला होता, असेही राष्ट्रपतींनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. आणीबाणी लागू झाली तेव्हा मुखर्जी इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात कनिष्ठ मंत्री होते.

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असून इंदिरा राजवटीतील अनेक बाबींचा उलगडा यातून होतो. आणीबाणी लागू करण्यासाठी आपण इंदिराजींना कसा मोलाचा सल्ला दिला, असा दावा आणीबाणी लागू झाल्यानंतर अनेक नेते करत होते. मात्र, १९७५ नंतरच्या या काळात लोकांवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करणा-या शहा आयोगासमोर मात्र अनेकांनी शब्द फिरवला. या लोकांनी नंतर इंदिरा गांधी यांच्यावरप ठपका ठेवला. यात सिद्धार्थ शंकर राय यांचाही समावेश होता, असा स्पष्ट उल्लेख पुस्तकात आहे.

शहा आयोगासमोर सुनावणी सुरू असताना इंदिरा गांधी लाल रंगाची साडी परिधान करून आल्या होत्या. सिद्धार्थ शंकर राय घाई-घाईने त्यांच्याजवळ गेले. म्हणाले, "आज आपण खूपच सुंदर दिसत आहात...' यावर इंदिराजींची प्रतिक्रिया अत्यंत रूक्ष होती. त्या एवढेच म्हणाल्या... "तुम्ही इतके प्रयत्न करूनही...!'

३२१ पानी पुस्तकातील नोंदी
>१९७५ मध्ये देशात पुकारण्यात आलेली आणीबाणी अतिधाडसाची कृती होती.
> काँग्रेस आणि दिवंगत इंदिरा गांधींना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली.
> आणीबाणीमध्ये मूलभूत हक्कांची गळचेपी होत होती. राजकीय कार्यक्रमांवर बंदी, तसेच प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप होती.
> लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली िवरोधक कसे एकवटले, १९७७ मधील काँग्रेसचा दारुण पराभव, काँग्रेसमधील मोठी फूट, १९७१चा बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा मुद्दा, १९८० मधील काँग्रेसचा विजय याचाही स्पष्ट उल्लेख.

तीन भागांत वर्णन
मुखर्जींनी पुस्तकाच्या पहिल्या भागात १९६९ ते १९८० दरम्यानचा काळ, दुस-या भागात १९८० ते १९९८ दरम्यानच्या घडामोडी, तर तिस-या भागात १९९८ ते २०१२ पर्यंत म्हणजे आपल्या सक्रिय राजकारणाच्या घडामोडी नोंद केल्या आहेत.