आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वकिलांच्या बेशिस्त वर्तनामुळे न्यायालयाचा मासळी बाजार’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : न्यायमंदिर अशी ओळख असलेल्या न्यायालयास माझ्या जीवनातील २३ वर्षे दिली आहेत. आजपर्यंतच्या करिअरमध्ये वकिलांकडून इतके बेशिस्त वर्तन कधीही पाहिले नाही. दररोज वकिलांकडून अशा प्रकारचे बेशिस्त वर्तन न्यायालयात घडते आहे. त्यांना पाहून असे वाटते की,
आपण न्यायालयात नव्हे, तर मासळी बाजारात उभे आहोत. शेवटी माझ्यासोबत कशा प्रकारच्या आठवणी सोबत येतील, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टी.एस. ठाकूर यांनी शुक्रवारी नोटाबंदीच्या प्रकरणात एका वकिलाचे बेशिस्त वर्तन पाहून केली. या वेळी ते भावुक झाले होते.

नोटाबंदी प्रकरणाची सुनावणी चालू असताना, अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी केंद्र सरकार देशातील जनतेला डिजिटलायझेशनकडे घेऊन जात असल्याप्रकरणी युक्तिवाद करत होते. तेव्हा अॅड. एम. एल. शर्मा त्यांच्या जागेवरून उठून रोहतगींचे बोलणे मध्येच थांबवत मोठ्या अावाजात त्यांचे मुद्दे मांडू लागले. त्यांनी म्हटले, हे संपूर्ण प्रकरण भ्रष्टाचाराचे आहे. सरकार एकीकडे चीनच्या वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी करते आहे, तर दुसरीकडे पेटीएमचा वापर करण्याविषयी सांगते. यात चीनच्या कंपनीची ५५ टक्के भागीदारी आहे. अॅड. एम. एल. शर्मा यांचे मोठ्या आवाजात ओरडून युक्तिवाद करणे मुख्य न्यायमूर्तींना आवडले नाही.

मुख्य न्यायमूर्ती ठाकूर यांनी वकिलास फटकारले, “तुमचे म्हणणे मांडण्याची ही योग्य पद्धत नाही. तुम्ही चांगले विधिज्ञ आहात. पण अशा प्रकारचे बेशिस्त वर्तन का करत आहात? युक्तिवाद मांडत असताना इतके भावुक का होत आहात? तुमच्या जवळच ज्येष्ठ विधिज्ञ बसलेले आहेत. त्यांचे वर्तन पाहा. त्यांच्याकडून काही शिका.’ मुख्य न्यायमूर्तींच्या या फटकारण्यामुळे एम. एल. शर्मा शांत झाले. त्यांनी युक्तिवाद मांडणे बंद केले.
संवेदनशील प्रकरणात वकिलांचे बेशिस्त वर्तन मुख्य न्यायमूर्तींनी म्हटले, सर्वोच्च न्यायालयात माझा हा अखेरचा महिना आहे. मला जड अंत:करणाने सांगावे लागते की, नोटाबंदीसारख्या संवेदनशील प्रकरणात वकिलांचे अशा प्रकारे बेशिस्त वर्तन दिसून येत आहे. असे वागणे योग्य नाही. अशी टिप्पणी केल्यानंतर न्यायमूर्तींनी नोटाबंदीबाबत पुढील सुनावणी घेतली.
बातम्या आणखी आहेत...