आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियाचे अध्यक्ष विडोडो आजपासून भारत दौऱ्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता/नवी दिल्ली - इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो सोमवारी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल होत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान आर्थिक आणि संरक्षण सहकार्य तसेच दहशतवाद निर्मूलन यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ‘दोन्ही देशांनी संरक्षण, सुरक्षितता आणि दहशतवाद निर्मूलन यावर सहकार्य करावे,’ असे मत त्यांनी मुलाखतीत व्यक्त केले.

एकेकाळी हिंदू आणि बौद्धबहुल लोकसंख्या असणारा इंडोनेशिया सध्या जगात सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असणारा देश आहे. जोको विडोडो २०१४ मध्ये इंडोनेशियाचे अध्यक्ष झाले आहेत. हा त्यांचा पहिला भारत दौरा आहे. विडोडो म्हणाले की, दहशतवाद हे मोठे आव्हान असून भारत आणि इंडोनेशिया यांनी एकत्रित येऊन त्याचा मुकाबला करायला हवा. दहशतवाद निर्मूलनासाठी आम्ही कोणत्याही देशाला सहकार्य करण्यास तयार आहोत. भारताशी या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या दौऱ्यामुळे भारत आणि इंडोनेशिया यांना द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याची संधी मिळेल. हा आमच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

विडोडो यांच्यासोबत त्यांच्या पत्नी इरियाना आणि अनेक कॅबिनेट मंत्री येत आहेत. त्यात परराष्ट्र, व्यापार, उद्योग, गुंतवणूक आणि आरोग्य विभागाच्या मंत्र्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर एक उच्चस्तरीय व्यावसायिक प्रतिनिधी मंडळही येत आहे. अध्यक्ष विडोडो हे भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख उद्योगपतींचीही भेट घेणार आहेत. दोन्ही देशांचे उद्योगपती औषध निर्माण, माहिती तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर चर्चा करतील.

भारतीय नागरिकाची शिक्षा माफ होणार नाही
बोगोर (इंडोनेशिया) । अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेला भारतीय नागरिक गुरदीपसिंग (४८) याला माफ केले जाणार नाही, असे इंडोनेशियाचे अध्यक्ष विडोडो यांनी स्पष्ट केले आहे. भारत दौऱ्याआधी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, मृत्युदंडाची शिक्षा फक्त गंभीर गुन्ह्यांतच दिली जाते. नागरिकत्व पाहून शिक्षा दिली जात नाही. गुरदीपसिंगला २०१४ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला गोळ्या घालून ठार करण्यात येणार होते, पण या वर्षी २९ जुलैला शिक्षा टळली होती.
बातम्या आणखी आहेत...