आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी विद्यापीठे भारतात शाखा उघडण्यास अनुत्सुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विदेशी विद्यापीठांनी देशात कुठेही शैक्षणिक शाखा सुरू कराव्यात, यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असले तरी विदेशी विद्यापीठे मात्र त्यासाठी फारशी उत्सुक दिसत नाहीत. येल, केंब्रिज, शिकागो, स्टॅनफोर्डसारखी जगातील प्रमुख विद्यापीठे भारतात त्यांचे केंद्र सुरू करण्यास फारशी उत्सुक दिसत नाहीत. स्वतंत्र केंद्र स्थापन करण्याऐवजी स्थानिक विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांशी करार करून शैक्षणिक आदान-प्रदान करण्याची तयारी यापैकी अनेक विदेशी विद्यापीठांनी दाखवली आहे.

केंब्रिज विद्यापीठाचे कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख टीम होल्ट यांनी ई-मेलवर सांगितले की, त्यांची संस्था प्रमुख विद्यापीठांत संशोधन व शैक्षणिक करार करण्यास इच्छुक आहे. आम्ही स्थानिक विद्यापीठांचे प्रतिस्पर्धी बनू इच्छित नाही. तर त्यांच्यासोबत मिळून विद्यार्थी, शिक्षकांचे आदान-प्रदान करण्यावर भर देऊ इच्छितो. नवी दिल्लीत शिकागो विद्यापीठाचे अध्यक्ष रॉबर्ट जे. जिमर यांनी सांगितले की, आम्ही मार्च 2014 पर्यंत भारतात आमचे शैक्षणिक केंद्र सुरू करू इच्छितो. परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी केंद्र सुरू करण्याचा आमचा विचार नाही. विचारांच्या मुक्त प्रवाहासाठी भारतीय संस्थांसोबत मिळून विद्यार्थी-शिक्षक आदान-प्रदान वाढण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू इच्छितो. त्यातून शिष्यवृत्ती व संशोधनाला प्रोत्साहन देऊ इच्छितो.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विदेशी विद्यापीठांसमोर भारतात येऊन कंपनीच्या स्वरूपात त्यांचे केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मंत्रालयाने यासंदर्भात औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागास (डीआयपीपी) व वित्त विभागास (डीईए) प्रस्ताव पाठवला होता. विदेशी विद्यापीठांना कंपनी अधिनियमांतर्गत एक कंपनी म्हणूनच शैक्षणिक केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे. येल विद्यापीठानेही भारतात शैक्षणिक केंद्र सुरू करण्याचा आमचा तूर्तास कोणताही विचार नाही, असे स्पष्ट केले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठानेही भारतात तूर्तास स्वतंत्र केंद्र सुरू करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, यूजीसी अधिनियमांतर्गत मंत्रालयातर्फे विदेशी शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेस परवानगी देण्याबाबत नियमावलीस अंतिम रूप देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

विदेशी विद्यापीठांसाठी जाचक अटी
भारतात केंद्र सुरू करण्यासाठी इच्छुक असणारी विदेशी संस्था टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग, क्वाक्वारेली सायमंड्स रॅकिंग किंवा शांघाय जियो तोंग विद्यापीठाने तयार केलेल्या जगातील 400 सर्वोच्च् विद्यापीठांच्या यादीत सहभागी असले पाहिजे. केंद्र सुरू करण्यापूर्वी 25 कोटी रुपयांचा कोश त्यांना स्थापन करावा लागेल. यूजीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास 50 लाख ते एक कोटीपर्यंत दंडाची कारवाई अशा अटी आहेत. त्या जाचक वाटत असल्यानेच विदेशी विद्यापीठे भारतात येण्यास तयार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.