नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आंतरराष्ट्रीय योग दिवस ऐतिहासिक व्हावा म्हणून सरकारने विविध आघाड्यांवर तयारी सुरू केली आहे. त्यासाठी जगातील सर्व देशांसोबत मिळून एकाच वेळी एकाच मुद्रेत "योगासन' करण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालय विदेशात या कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे, तर भारतात त्याची जबाबदारी आरोग्य मंत्रालयाच्या आयुष विभागावर सोपवण्यात आली आहे. जागतिक पातळीवर हा कार्यक्रम ऐतिहासिक आणि विक्रमी स्वरुपात साजरा होऊन त्याचा प्रभाव कायम राहावा यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज स्वत: त्यावर देखदेख करणार आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जागतिक पातळीवर विविध देशांमधील वेळांचा फरक लक्षात घेता योगासाठी एकच वेळ निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कालगणनेनुसार एक वेळ पाळण्यासाठी घड्याळात काही सेकंदांचा बदल केला जातो. तशाच प्रकारे योगासाठी वेळ निश्चित केला जाईल. या शिवाय ज्या ठिकाणी तीन ते पाच हजार लोक एकत्र येऊन योगा करू शकतील, अशा ठिकाणांचीही िनवड केली जात आहे. यात संबंधित देशांचे सर्वोच्च प्रतिनिधी उपस्थित राहावेत, असाही प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे भारतीय योगाला वेगळी ओळख मिळेल. तसेच भारतात अनादिकाळापासून योगा पद्धती आहे हे जगाला कळेल.
हजार कोटींचा व्यवसाय
एका अन्य अधिकाऱ्याने सांगितले की, प्रचारासाठी योग गुरू बाबा रामदेव, अाध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्यासह सर्व मुख्य योग, अध्यात्म गुरूंच्या छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप तयार केल्या जात आहेत. यात ते योगाचे महत्त्व व भारतीय योग पद्धतीबाबत सांगतील. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये त्याचे प्रसारण केले जाईल. या माध्यमातून १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीचेे नवे व्यवसाय विकसित होतील. त्यातून भारतीय योग संस्थांना जागतिक विद्यार्थी मिळतील.त्याचा अप्रत्यक्ष लाभ पर्यटनाला होईल.
व्यावसायिक गणित असे
एका स्रोतानुसार २००८ मध्ये योग इंडस्ट्री १.७२ लाख कोटींची (जवळपास २७ दशलक्ष डॉलर) होती. यात भारतातील निवडक अध्यात्म गुरू व योग संस्थांचा वाटा मोठा आहे. भारतात या क्षेत्राला चीनकडून तगडे आव्हान आहे. चीन त्यांची एक जुनी पद्धती योगा असल्याचा दावा करतो. अमेरिकेतील संस्था योगाचे पेटंट मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे २००८ मध्ये भारताच्या लक्षात आले. त्याविरुद्ध भारताने अपील केले. तेव्हापासून भारत विविध योगमुद्रांचे पेटंट करत आहे. या अभियानालाही याचा लाभ होईल, असे म्हटले जात आहे. रामदेव बाबांचे पतंजली विद्यापीठ, अय्यंगार परिवाराच्या योग शिक्षा क्लासेससह इतर संस्थांना जागतिक पातळीवर व्यवसाय विस्ताराची संधी उपलब्ध होईल.