नवी दिल्ली - २१ जून हा अांतरराष्ट्रीय याेग दिन म्हणून भारतात साजरा करण्यात येताे. यंदा मात्र २१ जून राेजी २०० देशांमध्ये याेगाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. संयुक्त राष्ट्र संघाने ३ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या आवाहनानुसार आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी २१ जूनचा दिवस जाहीर केला अाहे. भारतात यंदा लखनऊ येथे मुख्य कार्यक्रम हाेणार आहे.
त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बाबा रामदेव आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार अाहेत. लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानात अायाेजित या कार्यक्रमामध्ये किमान ५० हजारांवर लोक सहभागी होतील. याशिवाय ७२ केंद्रीय मंत्री हे देशातल्या ७० वेगवेगळ्या शहरात योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एकट्या दिल्लीमध्ये ७ माेठ्या कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले अाहे.
विशेष म्हणजे पॅरिसला आयफेल टॉवरसमोरचे मैदान, लंडनचे ट्रॅफलगार चौक अाणि न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क येथेही याेग दिवस साजरा हाेत अाहे. केंद्र सरकारने याेग हा विषय अायुष मंत्रालयाकडे साेपविला असल्याने अायुष मंत्री श्रीपाद नाईक हे देशभरातील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष लक्ष ठेवून अाहेत. याेगाला कायमस्वरूपी प्राेत्साहन मिळावे यासाठी देशात या मंत्रालयातर्फे १०० मोठे योगा पार्क तयार करण्यात येत आहेत. शालेय शिक्षण अाणि कार्यालयीन कामकाजात तणाव कमी करण्यासाठी योगविद्येचा समावेश करण्यात आला आहे. याेगाच्या व्यापक विस्तारासाठी योगविद्या प्रसार व विकास कार्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पंतप्रधान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.