आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत बालकेही बसली होती; वाटले, त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदारांच्या निलंबनाबाबत अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याशी "दिव्य मराठी'ने संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी सभागृहातील गोंधळ थांबवतेय, बोलणे नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील कामकाज ठप्प आहे. ताई (सुमित्रा महाजन) निर्णयाबाबत म्हणाल्या, निर्णय कठोर आहे; मात्र गोंधळाचा अतिरेक झाल्यामुळे तो देशहितासाठी घ्यावा लागला. अन्यथा नेत्यांचीच बदनामी होत आहे. नेता ही शिवी होऊ पाहत आहे. या निर्णयानंतर ताईंशी नवी दिल्लीतील २० अकबर रोडवरील निवासस्थानी धर्मेंद्रसिंह भदौरिया यांनी केलेल्या चर्चेतील काही अंश...

> निष्फळ ठरलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर तुम्ही खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता, असे सांगण्यात येते. तुम्ही तसे ठरवून आला होतात का?
- मी अचानक निर्णय घेतला नाही. शिवाय आधीपासूनच तसे ठरवलेही नव्हते. बैठक निष्फळ ठरेल असे काही नाही. जी चर्चा व्हायची होती ती झाली. खासदार अध्यक्षांसमोरील हौद्यात येतील, मात्र ते पाेस्टर आणणार नाहीत, अशी माझी अपेक्षा होती. मात्र, त्यानंतरही पोस्टर्स आणले. तुम्ही पोस्टर दाखवता, वेलमधूनबाहेर जात नाहीत. एका सदस्याने तर टेबलावर चढण्याचा प्रयत्न केला. हे अति झाले ना... त्या दिवशी सकाळपासूनच मला राग येतोय याचे संकेत दिले होते (हसत). याच कारणामुळे एक सदस्य म्हणाला, मी पोस्टर दाखवले नसतानाही मला निलंबित का करण्यात आले? किमान पोस्टर तर दाखवू नका, असे वारंवार सांगत राहिले. खरं सांगायचं तर गोंधळ वाढला होता तेव्हा प्रेक्षक गॅलरी मुलांनी भरली होती. त्या दिवशी मला वाटले की, प्रेक्षक गॅलरीत बसलेली मुले आणि नव्या सदस्यांना आपण काय दाखवू, त्यांचे भविष्य कसे घडवू, हा विचारही तेव्हा मनात आला.
> तुम्ही कधी वेलमध्ये गेला होतात?
- एखाद्या वेळेस गेली असेन. मी कधीच गेली नाही, असे म्हणणार नाही. मात्र, सर्वसामान्यपणे मला वेलमध्ये (अध्यक्षांसमोरील मोकळी जागा) जायला आवडत नव्हते. माझ्या स्वभावात ते नाही.
> तुमची कार्यपद्धती सरकारची बाजू घेणारी आहे, अशी विरोधकांकडून तुमची प्रतिमा केली जात आहे?
- सर्वांना बोलू देणे हे अध्यक्षांचे काम आहे. यासोबत सरकारचे कामकाजही व्हावे, हे पाहणेही माझे काम आहे. सभागृह चालावे, विधेयक कोणतेही असो, त्याचेही कामकाज व्हावे. अॉपोझिशन मस्ट देअर से, बट गव्हर्नमेंट आल्सो मस्ट देअर वे. मला तर दोघांनाही सांभाळायचे आहे. सदस्यांचे निलंबन करण्याचा माझा निर्णय होता. ३७४ अ अंतर्गत तो घेतला. सरकारशी त्याचा संबंध नाही. समज द्यावयाची असेल तर दोघांनाही देते, तेव्हा पक्ष पाहत नाही.
> शरद यादव म्हणाले, यामुळे सरकार आणि विरोधी पक्षातील सहकार्याची स्थिती आणखी वाईट होईल?
- याचे उत्तर मी देऊ शकत नाही. विरोधकांशी समन्वय कसा राखावा, याचा विचार सरकारने करावा. सहमती बनवणे सरकारचे काम आहे. सभागृह व्यवस्थित चालावे, नियमानुसार कामकाज व्हावे, याचा मी प्रयत्न केला आहे.
> निर्णयामुळे आपल्या प्रतिमेवर परिणाम होईल?
- मला तसे वाटत नाही. चूक झाल्यावर आईही आपल्या मुलांना एखादी थप्पड देते. मात्र, त्यामुळे आई मुलांवर प्रेम करणे थांबवत नाही. वेळेनुसार कृती केली पाहिजे. तसे प्रयत्न व्हावेत. सभागृहात ३०० पेक्षा जास्त नवे सदस्य आहेत. त्यात ७२ ते ८० लोक ४०-४५ पेक्षा कमी वयाचे आहेत. मी दोन टप्प्यांत सर्व पक्षांच्या खासदारांची बैठक अापल्या निवासस्थानी घेतली. मात्र, चर्चा चांगली व्हावी हाही माझा एक प्रयत्न आहे.
> तुम्ही उचललेल्या कठोर पावलामुळे सरकारच्याही अडचणी वाढल्या?
- मी कठोर पाऊल अवश्य उचलले. माझ्या स्वभावात हे नाही, याची मला जाणीव आहे. काही जणांना याचा धक्का बसला. मी सलग आठ दिवस या गोंधळाला सामोरे जात होते. मी स्वत: नेत्यांची बैठक बोलावली. किमान पोस्टर्स तरी दाखवू नका एवढी मी अपेक्षा ठेवली. मी त्यांना बोलण्यास किंवा घोषणाबाजी बंद करण्यास सांगितले नाही. जागेवरूनच काय ते त्यांनी बोलावे. तुमची चर्चा करण्याची इच्छा नसेल, तर ३५० पेक्षा जास्त सदस्यांना ती हवी आहे. त्यांना ही संधी नाकारणे लोकशाहीविरोधी नाही का? याचे मला कोणी उत्तर द्यावे.
> घाईत निर्णय झाला असे तुम्हाला वाटत नाही काय?
- मला चूक वाटत नाही. घाईत निर्णय घेतला नाही. मी आठ दिवस प्रयत्न केले. त्यासाठी बैठक घेतली. तृणमूलचे खासदार छत्री घेऊन आले होते. मी त्यांना रोखल्यावर त्यांनी ऐकले. योग्य चर्चा व्हावी, अशी माझी अपेक्षा होती. देशासाठी हा निर्णय घ्यावा लागला, अन्यथा नेत्याचाच जास्त अवमान होत आहे. नेता ही शिवी होत आहे. कोणी काहीही म्हणो, मी देशहिताचे काम केले. माझे मन स्वच्छ आहे. खासदारांचे अति होत होते. तुम्ही त्याला कठोर निर्णय म्हणू शकता.
> लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, तुमचे पाऊल लोकशाहीविरोधी आहे. तुम्हाला काय वाटते?
- लोकशाहीविरोधी...(हसत-हसत) पहिली गोष्ट म्हणजे घटनेनुसार योग्य लोकशाहीच्या स्थापनेसाठी मी काम करत आहे, असे मला वाटते. नियमानुसार सभागृह चालवण्याचा प्रयत्न करत असले तर ते लोकशाहीविरोधी कसे होईल? संसद चर्चेसाठी आहे, तिचे आपलेही पावित्र्य आहे. मी त्यांचे बोलणे नव्हे, गोंधळ बंद करत आहे.
> आधी व आताच्या सत्रात काय फरक आहे?
- संसद सभागृहाचे कामकाज आधीही खंडित होत होते. विरोधक चर्चेची मागणी करत होते, तेव्हा चर्चा होत नव्हती. विरोधी पक्ष चर्चेस तयार नसल्याची ही पहिली वेळ असावी. तुम्ही चर्चा करा. सभागृहातील चर्चेत एखादा दोषी आढळला तर ती गोष्ट वेगळी, असे वाटते.
> माजी राष्ट्रपती कलाम यांना वाटत होते की, संसद अधिवेशनात विशिष्ट वेळेऐवजी कामकाज पूर्ण होईपर्यंत चालवले जावे.
- त्याचाच प्रयत्न होत आहे. तुम्ही पाहिले असेल याआधीच्या अधिवेशनातील कामकाज निश्चित वेळेआधी संपले नाही. सर्व विधेयके मंजूर करून घेणे सरकारची जबाबदारी आहे. चर्चेविना विधेयक मंजूर व्हावे, अशी माझी इच्छा नाही. याआधी चर्चेविना विधेयके मंजूर होत असावीत. मात्र, चर्चा होऊ नये, असे मला वाटत नाही.