नवी दिल्ली - पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर
नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच सीएनएनला मुलाखत दिली. यात भारतीय मुस्लिमांच्या मानसिकतेबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले. भारतात १७ कोटी मुस्लिम आहेत. एवढी प्रचंड लोकसंख्या असूनही यातील कुणी अल कायदाशी जोडला गेला असेल असे वाटत नाही. उलट अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ही भारताच्या तुलनेत कमी लोकसंख्येची मुस्लिम राष्ट्रे असूनही तेथील मुस्लिमांवर अल कायदाचा अधिक प्रभाव आहे. या तथ्याच्या आधारे सीएनएनने मोदींना प्रश्न केला. यावर मोदी म्हणाले, ‘याचे मानसशास्त्रीय विश्लेषण करता येणार नाही. मात्र, या विश्वात मानवतेचे रक्षण केलेच पाहिजे. म्हणूनच मानवतावादावर विश्वास असलेल्या सर्वांनीच एक झाले पाहिजे. हा दहशतवाद केवळ एखाद्या देशाविरुद्धचे नव्हे, समस्त मानव जातीवर आलेले संकट आहे. ही मानवतावाद आणि अमानुषतेची लढाई आहे.’
मोदी म्हणाले...
१. भारत-अमेरिकेदरम्यान धोरणात्मक आघाडी शक्य आहे. अनेकदृष्ट्या दोन्ही देशांत साम्येही आहेत.
२. गेल्या शतकात दोन्ही देशांतील संबंधांत चढ-उतार होते. मात्र २१ व्या शतकात खूप बदल झाला आहे. सहकार्य वाढले आहे.
३. दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांचा केवळ धोरणांच्या आधारे विचार केला जाऊ नये. त्याहीपलीकडे जाऊन हे धागे अधिक पक्के करण्यावर विचार व्हायला हवा. सुदैवाने दोन्ही देश आज या मार्गावर सकारात्मक रीतीने वाटचाल करत आहेत.
मोदींच्या वक्तव्याचे स्वागत
* मुस्लिमांबद्दल मोदींनी केलेल्या वक्तव्याचे देशातील मुस्लिम नेत्यांनी जोरदार स्वागत केले आहे.
* मोदींनी सत्यकथन केले आहे. यामुळे लोकांत विश्वास दृढ होईल आणि धार्मिक तेढ निर्माण करू पाहणा-यांचे मनसुबे उधळले जातील : मुफ्ती मुकर्रम अहमद, शाही इमाम,
फत्तेहपुरी मशीद
* मोदींच्या या वक्तव्याने जगात सकारात्मक संदेश जाईल. त्यांचे संसदेतील भाषणही तेवढेच दमदार होते : सय्यद जफर महमूद, अध्यक्ष, जकात फाउंडेशन ऑफ इंडिया.
* मोदींचे वक्तव्य अतिशय चांगले आहे. त्यांनी त्यांच्या नेत्यांनाही याची अंमलबजावणी करण्यास सांगावे : सुलतान अहमद, तृणमूल नेते, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य.
* पंतप्रधानांच्या या वक्तव्याचे स्वागतच व्हायला हवे. योग्य वेळी त्यांनी हे वक्तव्य कले आहे. : मुफ्ती एजाज अर्शद कासमी, दिल्ली वक्फ बोर्डाचे सदस्य.
* भाजपचे काही नेते भडक विधाने करत असताना पंतप्रधान मोदींनी केलेले भाष्य स्वागतार्ह आहे.
: गौरव भाटिया, प्रवक्ते, सपा