आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराण-भारत-पाक पाइपलाइन लवकरच मार्गी लागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताशी व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने इराण उत्सुक असून इराण-पाकिस्तान-भारत हा पाइपलाइन प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, असे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांचे प्रतिनिधी मेहंदी मेहदीविपोर यांनी म्हटले आहे.

नियोजित पाइपलाइनचा प्रकल्प पूर्ण झाला तर भारताला पेट्रोलियम पदार्थांचा थेट पुरवठा अतिशय कमी खर्चात करता येणार आहे. या माध्यमातून देशांतर्गत वीज उत्पादन वाढून भारत या क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ शकेल, असे मेहंदी म्हणाले. रविवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते.
गॅस आणि तेल पाइपलाइन टाकण्याचे काम इराण-पाक पाकिस्तान सीमेपर्यंत पूर्ण झाले आहे. पुढे पाइपलाइन वाढवण्यासाठी पाकिस्तानशी बोलणी सुरू असून ही पाइपलाइन लवकरच भारतीय हद्दीत पोहोचेल, अशी आशा मेहंदी यांनी या वेळी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या योजनेची त्यानी स्तुती केली.
भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या देशांच्या प्रतिनिधींसाठी गुजरातमध्ये नुकतीच व्हायब्रंट गुजरात परिषद घेण्यात आली. या परिषदेला परदेशातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही परिषद अशा परदेशी गुंतवणुकीच्या दृष्टीने निश्चित फलदायी ठरेल, अशी आशा मेहंदी यांनी व्यक्त केली. ऐतिहासिक काळापासून सलोख्याचे असलेले भारत-इराण संबंध आगामी काळात आणखी दृढ होतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.