आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Iraq Army Retakes Saddam Hussein\'s Home Village

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकमधून सुटका झालेल्या 46 नर्सेसचे कोचीत स्वागत, कुटुंबीयांना पाहून चेहरे खुलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इराकमध्ये आयएसआयएस दहशतवाद्यांच्या तावडीत असलेल्या 46 भारतीय नर्सेस शनिवारी सकाळी भारतात परतल्या. भारत सरकारने पाठवलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने सकाळी 8.30 वाजता त्या मुंबई विमानतळावर आल्या. येथे काही वेळ विमान थांबल्यानंतर कोचीच्या दिशेने उड्डाण केले. दुपारी 12.30 दरम्यान हे विमान कोचीला पोहचले. येथे सर्व नर्सेस उतरल्या. कोची विमानतळावर त्यांच्या कुटुंबींयांनी जोरदार स्वागत केले. कुटुंबीयांना पाहुन नर्सेसच्या चेहर्‍यावर हसु फुलले होते. इराकहून नर्सेससोबत त्या विमानात आणखी 70 भारतीय आले आहे. कोचीहून हे विमान हैदराबाद येथे जाणार आहे. हैदराबाद येथील मजूरांना सोडून विमान दिल्लीला जाईल.
इराकमध्ये दहशतवादी आणि लष्कर यांच्यात संघर्ष सुरु आहे. इराक लष्कराचा दावा आहे, की त्यांनी दहशतवाद्यांच्या ताब्यातील मोठा भाग मुक्त केला आहे.
स्वदेशी परतल्या परिचारिका
आयएसआयएस या सुन्नी दहशतवाद्यांनी इराकमध्ये ओलीस ठेवलेल्या 46 भारतीय नर्सेसची नाट्यमय घडामोडींनंतर सुटका केली असून त्यांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान शुक्रवारी इर्बिलला रवाना करण्यात आले होते. जवळपास गेल्या 15 दिवसांपासून दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या या नर्सेस आज सकाळी मायदेशी परतल्या आहेत.
दहशतवाद्यांनी सुटका केलेल्या सर्व नर्सेस काही वेळातच कोचीला पोहोचतील. या सर्व नर्सेसना त्यांच्या इच्छेविरुद्ध दहशतवाद्यांनी अज्ञात स्थळी नेले होते. त्या इर्बिलमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले होते. उत्तर इराकमध्ये असलेले इर्बिल हे शहर कुर्दीश प्रांताची राजधानी आहे. या सर्व नर्सेस माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन याचे गाव तिक्रितमधील रुग्णालयात नोकरीस होत्या. 9 जून रोजी आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी तिक्रितवर हल्ला चढवल्यापासूनच या नर्सेसची अग्निपरीक्षा सुरू झाली होती.
मोसूलला नेले अन् सुरक्षित सोडले
तिक्रितमधील या नर्सेसना त्यांच्या इच्छेविरुद्ध एका वाहनात बसवून मोसूलला नेण्यात आले होते. तेथे त्यांना एका इमारतीच्या तळमजल्यात ठेवण्यात आले होते. मोसूल तिक्रितपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे. दहशतवाद्यांनी नर्सेसबाबत सौम्य भूमिका घेतली आणि त्यांना सुखरुप सोडण्याचा शब्दही दिला होता.
सुटकेसाठी गेले होते बोइंग 777
इर्बिलमधून नर्सेसना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे बोइंग 777 हे विमान शुक्रवारी सायंकाळी रवाना झाले. 300 प्रवासी बसण्याची या विमानाची क्षमता आहे. इराकमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी एअर इंडियाने तीन मोठी विमाने आणि चालक दल सज्ज ठेवलेले होते.
एकत्रित प्रयत्नांचे यश
भारत सरकार, बगदादमधील भारतीय दूतावास, राज्य सरकार यांनी एकत्रित प्रयत्न केल्यामुळे नर्सेसची सुटका झाली. त्या आज कोचीला पोहोचतील,असे केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी परिषदेत सांगितले.

स्थलांतर कायदा कडक करा : अ‍ॅम्नेस्टी
हिंसाचारग्रस्त इराकमध्ये नर्सेसना ओलीस ठेवल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून स्थलांतर कायदा आणखी कडक करा, असे आवाहन अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने केंद्र सरकारला केले आहे. व्हिसामधील घोटाळे आणि सौदी अरबमध्ये भारतीयांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन याबाबतचा संशोधन अहवाल अ‍ॅम्नेस्टीने सादर केला. या नर्सेसना वेळेवर पगार देण्यात आला नसल्यामुळेच त्या इराकमध्ये अडकून पडल्या, असे या अहवालात म्हटले आहे.

छायाचित्र - कोची विमानतळावर पोहोचल्या नर्स.