आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामचुकार बाबूंची आता सरकार घेणार हजेरी, हजेरीनुसारच बढती व पगारवाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कार्यालयात कामाऐवजी वेळकाढूपणा, गप्पा हाणणा-या व वारंवार दांडी व उशिरा येणा-या केंद्रीय कर्मचा-यांची सरकार आता चांगलीच हजेरी घेणार आहे. केंद्र सरकार कार्यालयांत कर्मचा-यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. सर्व कर्मचा-यांना बायोमेट्रिक चिप असलेले कार्ड दिले जाणार आहे. त्या माध्यमातून त्यांची ऑटोमॅटिक हजेरी लागेल. कार्यालयातील उपस्थितीच्या आधारावर कर्मचा-यांची बढती व पगारवाढीचे निर्णय घेतले जातील.

पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी सांगितले की, नव्या व्यवस्थेमुळे लेटलतीफ कर्मचा-यांवर अंकुश बसेल. बाबूंना फक्त कामासाठीच वेतन मिळेल, टर्रेबाजी करण्यासाठी नव्हे. ही नवी व्यवस्था ३१ डिसेंबरपासून दिल्लीत, तर २६ जानेवारीपासून देशभरातील केंद्रीय कार्यालयांत लागू होणार आहे.

कर्मचा-याचे लोकेशन रिअलटाइम
कार्डात बसवलेली चिप बीएसएनएल, एमटीएनएलशी लिंक असेल. कर्मचा-यांच्या लोकेशनची माहिती सरकारला "रिअलटाइम' मिळेल. कार्यालयात येण्याजाण्याआधी बायोमेट्रिक सिस्टिममध्ये एंट्री करावी लागेल. म्हणजेच कर्मचारी कार्यालयात किती वेळा आले आणि बाहेर गेले याचीही सर्व्हरवर नोंद होईल.

वेतनवाढ व बढती रोखणार
अटेंडन्स सिस्टिमचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल. कर्मचा-याचा कामचुकारपणा उघड झाल्यास त्याची वेतनवाढच नव्हे तर बढतीही रोखून धरली जाऊ शकते.

अर्धा तास उशीर; अर्ध्या दिवसाचे वेतन कापणार
सरकारने आणू घातलेल्या या नव्या व्यवस्थेनुसार कार्यालयात अर्धा तास उशिरा पोहोचणा-या कर्मचा-यांना केवळ अर्ध्या दिवसाचाच पगार मिळेल. दररोज उशिरा येणे वा अनावश्यकपणे कार्यालयातून गायब राहणा-या कर्मचा-यांना "लीव्ह विदाऊट पे' म्हणजेच विनापगारी रजा समजले जाईल.