आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- इशरत जहाँ चकमक प्रकरणात इशरतला दहशतवादी ठरवण्यामागे आयबीचे माजी विशेष संचालक राजेंदरकुमार यांचा हात असल्याचा खळबळजनक दावा सीबीआयने केला आहे. गृह खात्याने जाहीर केलेल्या शपथपत्रात 19 वर्षीय इशरतला दहशतवादी ठरवण्यात आले आहे, असेही केंद्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
सीबीआयने पुरवणी आरोपपत्रात कुमार यांचा समावेश केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाला कुमार यांनी माहिती पुरवली. चकमकीच्या घटनेत मुंबईतील या मुलीसह आणखी चार जण ठार झाले होते. घटनेच्या दोन महिन्यांतच गृहखात्याचे सचिव आर. व्ही. एस. मनी यांनी गुजरात उच्च न्यायालयात दोन शपथपत्रे दाखल केली होती. 6 ऑगस्ट 2009 रोजी शपथपत्र दाखल केले. त्यात इशरतसह इतर तिघे दहशतवादी असल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर दुसर्या शपथपत्रामध्ये मात्र मनी यांनी इशरत दहशतवादी असल्याचा निष्कर्ष निघाला नसल्याचे मान्य केले होते. 30 सप्टेंबर 2009 रोजी हे दुसरे शपथपत्र दाखल करण्यात आले होते, असा सीबीआयचा दावा आहे. पुरवणी आरोपपत्रात कुमार यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. गुन्ह्याचा कट रचणे, हत्या असा ठपका कुमार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय कुमार यांच्यावर अतिरिक्त आरोप ठेवण्यात आला. शस्त्र पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 14 जून 2004 रोजी त्यांनी शस्त्र पुरवले, असा आरोप आहे. सीबीआयने गेल्या वर्षी 3 जुलै रोजी पहिले आरोपपत्र दाखल केले होते. त्या वेळी चार अधिकार्यांची नावे सांगण्यात आली होती.
कुमार यांच्या व्यतिरिक्त आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा, पीपी पांडे, गिरीश सिंघल यांच्यासह एन. के. अमीन, जे. जी. परमानर आणि अंजू चौधरी यांचाही आरोपींमध्ये समावेश होता.
इशरतची चौकशी
चकमकीपूर्वी इशरत आणि तिचा मित्र जावेद गुजरात पोलिसांच्या ताब्यात होते. एवढेच नाही तर कुमार यांनी इशरतची चौकशीदेखील केली होती. फार्म हाऊसवर ही झाडाझडती झाली होती, परंतु तिच्यासह चौघांना कोटारपूरजवळ आणण्यात आले. त्या वेळी त्यांच्या डोळ्यावर पट्टय़ा बांधण्यात आल्या होत्या. पूर्वनियोजितपणे करण्यात आलेल्या कृत्यामध्ये इशरतसह चौघांना गोळ्या घालण्यात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
पहिल्या शपथपत्रामागे कुमार
6 ऑगस्ट 2009 रोजी गुजरात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रामागे आयबीचे विशेष संचालक राजेंदरकुमार यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. चकमकीच्या घटनेचा सखोल तपास केला. त्यात ही माहिती उजेडात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
संयुक्त कारवाई
इशरत आणि अन्य तिघांवर करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे आयबी आणि गुजरात पोलिस यांची संयुक्त स्वरूपाची मोहीम होती यात दुमत नाही. ही चकमक बनावट असल्याचे तथ्य असून त्यात काहीही बदल झाला नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.