आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत भारतीयांवर हल्ले; लोकसभेमध्ये सदस्यांकडून चिंता, मल्लिकार्जुन खरगे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेत भारतवंशीय नागरिकांवर वंशद्वेषातून होणाऱ्या हल्ल्यांचे तीव्र पडसाद बुधवारी लोकसभेत उमटले. विरोधकांनी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. एकीकडे सरकार यात गांभीर्याने लक्ष घालत असल्याचे सांगण्यात येत असताना पंतप्रधानांचे मौन अनाकलनीय आहे, असे विरोधी पक्षांनी म्हटले.  

भारत सरकार या दिशेने कोणते प्रयत्न करत आहे याची माहिती द्यावी. अमेरिकेतील भारतीयांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलली जात असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते. त्याची माहितीही विरोधकांनी विचारली. यावर पुढच्या आठवड्यात सरकार सर्व खुलासा संसदेत सादर करेल, असे सिंह यांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यांत दोन भारतीयांना अमेरिकेत ठार करण्यात आले होते. दरम्यान, या मुद्द्यावरून संसदेचे कामकाज तहकूब केले जाणार नाही, असे सभागृह अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले.
 
तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत रॉय यांनीदेखील मोदी भारतीयांचे संरक्षण करण्यास असमर्थ असल्याची टीका केली. भारतीयांच्या हितासाठी अमेरिकेवर दबाव वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती ठीक नसून लवकरच सरकार यासंबंधी सविस्तर माहिती देईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.  संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितले की, सरकार अमेरिकेतील घटनांवर बारकाईने नजर ठेवून आहे. त्यावर गांभीर्याने विचार करून पावले उचलण्यात येतील. अमेरिकेशी बातचीत करून संयुक्त पत्रक याविषयी सरकारने प्रसारित करावे, अशी मागणी टीआरएसचे जितेंदर रेड्डी यांनी केली. 
 
- अमेरिकेकडे हा मुद्दा लावून धरण्यात सरकारला अपयश आल्याची टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. पंतप्रधानांनी या घटनांचा जाहीर निषेध का केला नाही याबद्दल खरगेंनी आश्चर्य व्यक्त केले. मोदी आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या गळाभेटी घेतात. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतही त्यांच्या व्यापक चर्चा सुरू आहेत, पण इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर ते गप्प का, असा प्रश्न खरगेंनी विचारला.  
 
 
कोण काय म्हणाले 
- काँग्रेस नेते खरगे म्हणाले, 'अमेरिकेत नवे राष्ट्राध्यक्ष आल्यापासून भारतीयांवर वर्णद्वेषातून हल्ले वाढले आहेत.'
- तेलंगाणा राष्ट्र समितीचे खासदार जितेंद्र रेड्डींनीही या मुद्यावरुन भाजप सरकरावर हल्ला चढवला. अमेरिकेत हैदराबादचे इंजिनिअर श्रीनिवास कोचिभोतला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एका शीख व्यक्तीवरही गोळ्या झाडण्यात आल्या तर रेल्वेमध्ये ऑफ्रो-अमेरिकन व्यक्तीने भारतीय वंशांच्या मुलीवर, तुमच्या देशात चालते व्हा म्हणते अभद्र कॉमेंट केली.  रेड्डी म्हणाले, 'सर्व प्रकरणांमध्ये एक बाब प्रकर्षाने पुढे आली, ती म्हणजे तुम्ही चालते व्हा. अमेरिकेने या घटनांचा निषेध  केला आहे, मात्र याविरोधात कोणतीही ठोस कारवाई केली नाही. तेलगू भाषिक लाखो भारतीय अमेरिकेत नोकरी करतात. त्यांचे नातेवाईक चिंतातूर आहेत.'
- एआयएडीएमके खासदार थंबीदुराई म्हणाले, 'आता वेळ आली आहे की भारताने याबाबात आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करावा जेणे करुन भविष्यात अशा घटना होणार नाही.'
 
केंद्र सरकारने काय उत्तर दिले 
- विरोधकांच्या प्रश्नांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, भारत सरकार या प्रश्नावर पुढील आठवड्यात उत्तर देईल. अमेरिकेतील भारतीयांना तेथे सुरक्षित वाटेल अशी उपाय योजना केली जाईल. 
 
तृणमूल काँग्रेसचे आंदोलन 
- अमेरिकेत भारतीयांवर झालेल्या हल्ल्याविरोधात तृणमूल काँग्रेस सदस्यांनी गुरुवारी संसद परिसरात गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...