आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उशिराने का होईना राममंदिर होणारच - कटियार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - धर्मांतरानंतर राममंदिरावरून नवीन वादंगाला सुरुवात झाली आहे. अयोध्येत उशिराने का होईना राममंदिर होणारच. त्याला जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही, असे वक्तव्य आता भाजपचे खासदार विनय कटियार यांनी केले.

प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी (नाईक) आपले मत मांडले असेल तर त्यात त्यांची काय चूक, असा सवाल कटियार यांनी केला. साक्षी महाराज म्हणाले, नाईक यांनी राममंदिराविषयी आपले खासगी मत मांडले आहे. त्यात चूक काय ? राममंदिराचे बांधले जावे ही प्रत्येकाची इच्छा आहे आणि सर्वांचे ते हिताचेही आहे, असे भाजपचे अन्य एक खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या वक्तव्यावर मीडियाने दोघांना प्रतिक्रिया मागितली होती. त्यावर कटियार यांनी हे वक्तव्य केले. फैजाबाद येथील एका कार्यक्रमात राम नाईक यांनी राममंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा आहे व ती लवकरच पूर्ण व्हायला हवी, असे म्हटले होते.

विरोधक आक्रमक, चौफेर टीका
जदयूचे अध्यक्ष शरद यादव म्हणाले, "याच लोकांनी बाबरी मशीद पाडली. आता ताजमहालात मंदिर असल्याचे सांगत आहेत. सबका साथ, सबका विकास म्हणताहेत. पण विकास कुठे आहे?' राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर म्हणाले, 'सगळे पूर्वनियोजित आहे. धर्मांतरण, गोडसे आणि आता राममंदिर. जाणीवपूर्वक वातावरण बिघडवले जात
आहे.'

सरकारची कोंडी, मंत्री मूग गिळून गप्प
राममंदिरावरून होणा-या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडून सरकारची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले, प्रकरण कोर्टात आहे. मी काहीही बोलणार नाही.