आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंची मुलगी मिसा, जावई शैलेशला प्राप्तिकर विभागाने पाठवले समन्स; बेनामी संपत्तीप्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एक हजार कोटींच्या बेनामी संपत्ती प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती अडचणीत आल्या आहेत. प्राप्तिकर विभागाने राज्यसभेच्या खासदार मिसा  आणि त्यांचे पती शैलेशकुमार यांना समन्स पाठवले आहे.
 
या दांपत्याला ६-७ जून रोजी प्राप्तिकर अधिकाऱ्यांसमोर हजर राहून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. तत्पूर्वी, मनी लाँडरिंगच्या वेगळ्या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने मिसा यांचे सीए राजेश अग्रवाल यांना सोमवारी रात्रीच अटक केली होती. मिसाशी संबंधित मिशएल पॅकर्स अँड प्रिंटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अग्रवाल यांनी केलेले व्यवहारही चौकशीच्या फेऱ्यात आहेत.  
 
प्राप्तिकर विभागाने १६ मे रोजी लालूप्रसाद यादव, बिहार सरकारमधील त्यांची दोन मुले तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव तसेच मुलगी मिसा भारती यांच्या दिल्लीतील आणि आसपासच्या भागातील २२ ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यात लालू यांचे निकटवर्तीय प्रेमचंद गुप्ता यांच्या परिसरांचाही समावेश होता. भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी लालूंच्या कुटुंबीयांवर १००० कोटींच्या बेनामी संपत्तीच्या सौद्यात सहभागी होण्याचा आरोप केला होता.

यूपीए सरकारमध्ये लालू मंत्री असताना झाले होते सौदे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसा आणि शैलेश यांनी दिल्लीच्या आयजीआय विमानतळाजवळ बिजवासनमध्ये फक्त १.४१ कोटी रुपयांत एक फार्म हाऊस खरेदी केले आहे. त्याची खरी किंमत जवळपास १०० कोटी रुपये एवढी सांगितली जात आहे.
 
मिसा आणि त्यांच्या पतीने सैनिक फार्म्समध्येही एक फार्महाऊस खरेदी केले. यूपीएचे सरकार सत्तारूढ होते तेव्हा हे सौदे झाले होते. लालू तेव्हा प्रभावशाली मंत्री होते. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या रेकॉर्डनुसार, मिसा आणि शैलेश ४ कंपन्यांचे संचालक आहेत. त्यांनी डिसेंबर, २००२ मध्ये मिशेल पॅकर्स अँड प्रिंटर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती.
 
 
बातम्या आणखी आहेत...