आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीच्या राजदूताची नाकेबंदी; संतप्त भारताने संबंध तोडले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मच्छीमारांची हत्या करणार्‍या दोन खलाशांना परत पाठवण्याचा शब्द मोडल्यामुळे संतापलेल्या भारताने इटलीशी असलेले राजकीय संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांदरम्यान यापुढे राजदूत पातळीवर कोणतेही व्यवहार करण्यात येणार नाहीत. दरम्यान, ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारताचे इटलीतील राजदूत वसंतकुमार गुप्ता यांना रोमला न जाण्याचे निर्देश भारत सरकारने दिले आहेत.

गुप्ता यांची इटलीतील भारताच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारण्यासाठी त्यांनी रोमला जाऊ नये, असे निर्देश देण्यामागे भारताला राजदूत पातळीवर इटलीशी संबंध ठेवायचे नाहीत, असा उद्देश असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. एकीकडे गुप्ता यांना रोमला न जाण्याचे निर्देश देण्यात आल्यामुळे इटलीचे भारतातील राजदूत डॅनियल मॅसिनी यांच्यासाठी अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांनाही देश सोडून जायला सांगितले. जायला हवे मात्र त्यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित असून पूर्व परवानगीशिवाय त्यांना देश सोडून जाण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.

इटलीने दोन्ही खलाशांना परत पाठवण्याचे आपल्या राजदूतामार्फत सर्वोच्च न्यायालयाला दिलेले आश्वासन पाळले नसल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना देश सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच सोमवारपर्यंत हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बदलत्या परिस्थितीत सरकार इटलीबरोबरचे राजनैतिक संबंध तोडण्यात आल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला देऊ शकते आणि त्यानंतरच मॅसिनी यांच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

भारताचे राजदूत गुप्ता यांना रोमला न जाण्याचे निर्देश - गृह मंत्रालयाचे आदेश
इटलीचे राजदूत डॅनियल मॅसिनी यांनी देश सोडून जाऊ नये म्हणून देशातील सर्व विमानतळांसह देशाबाहेर जाणार्‍या सर्व मार्गांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मॅसिनी यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखा, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सतर्कता आदेशात म्हटले आहे. मॅसिनी यांनीच दोन खलाशांना भारतात परत आणण्याची लेखी हमी सर्वोच्च् न्यायालयाला दिली होती. मात्र, आता इटलीने त्यांना परत पाठवण्यास नकार दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन
इटलीने दिलेला शब्द पाळावा म्हणून भारताने सर्व बाजूंचे संबंध तोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. राजनैतिक संबंधांबरोबरच व्यापार आणि संरक्षणविषयक संबंधही भारताने ताणून धरले आहेत. देशातील सर्व सरकारी संस्था न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतील, इटली जोपर्यंत सर्वोच्च् न्यायालयाला दिलेला शब्द पाळत नाही, तोपर्यंत द्विपक्षीय संबंध पूर्वपदावर येणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी भारतीय सागरी हद्दीत मस्सीमिलियानो लॅट्टोर आणि सल्व्होटोर गिरॉन या दोन इटालियन खलाशांनी भारतीय मच्छीमारांची हत्या केली होती. इटलीमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सर्वोच्च् न्यायालयाने त्यांना 22 फेब्रुवारी रोजी इटलीला जाण्याची परवानगी दिली होती आणि मतदान करून चार आठवड्यांत भारतात परत येण्याचे निर्देश दिले होते. मात्र, इटलीने या दोघांनाही परत पाठवण्यास नकार दिल्याने वाद विकोपाला गेला आहे.

खलाशांना परत पाठवणेच इष्ट
खलाशांच्या मुद्द्यावर इटलीने घेतलेली भूमिका कायदेशीर, नैतिक आणि राजनैतिकदृष्ट्या चुकीची असून इटलीने त्या दोघांनाही भारतात पाठवणेच इष्ट ठरेल, असे मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी म्हटले आहे.