आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaitley Cites Hitler’s Actions To Target Congress Over Emergency

हिटलरचे उदाहरण देत भाजपने काँग्रेसवर सोडले टीकास्त्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - असहिष्णुतेच्या मुद्द्यावर घेरल्या गेलेल्या मोदी सरकारने हिटलरचे उदाहरण देत काँग्रेसवर संविधान कमकुवत करून आणीबाणी लादल्याचा आरोप केला. राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, संविधान नष्ट करण्यासाठी संवैधानिक व्यवस्थेचा दुरुपयोग केला जाणे ही इतिहासातील सर्वात दु:खद घटना आहे.

१९३३ मध्ये जर्मनीत आणीबाणीनंतर जगाने त्याचे जिवंत उदाहरण अनुभवले. हिटलरने जर्मनीची संसद पेटवून देण्याची शंका घेत आणीबाणी लागू केली होती. संविधान दुरुस्तीच्या बहुमतासाठी विरोधी नेत्यांना अटक केली. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने लादल्यानंतर आपला २५ कलमी आर्थिक कार्यक्रम सादर केला. त्यानंतर सरकारच्या कोणत्याही निर्णयाला कोर्टात आव्हान देता येणार नाही असा कायदा केला. ‘अडॉल्फ हिटलर म्हणजे जर्मनी आणि जर्मनी म्हणजे अडॉल्फ हिटलर ’असे हिटलरचे तत्कालीन सल्लागार रडोल्फ हेज यांनी म्हटले होते. १९३३ च्या घटनाक्रमाचे आपण फक्त उदाहरण दिले आहे. त्यानंतर जगाच्या अन्य भागात जे काही घडले त्यावर जर्मनीने कधी कॉपीराइटचा दावा केला नाही. देशातील आणीबाणीचा काळ हा हुकूमशाहीचा सर्वात वाईट काळ होता. जगणे आणि स्वातंत्र्याचाही अधिकारही हिरावून घेण्यात आला होता, असे जेटली म्हणाले.
भविष्यात संविधानाशी छेडछाड नको : मुलायम
संविधानात वारंवार केल्या जाणाऱ्या दुरुस्त्या हा षड्यंत्राचा भाग आहे, असे सांगत आरएसएस प्रमुखांनी आरक्षणासंबंधी संविधानाची समीक्षा करण्याची मागणी केली आहे, त्यानुसार मोदी सरकार संविधान, आरक्षणाची समीक्षा करणार काय? असा सवाल सप नेते मुलायमसिंह यादव यांनी केला. भविष्यात संविधानात कोणतीही दुरुस्ती होणार नाही, याचा संकल्प करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
लोकसभेत गोंधळ, गेहलोत यांची माफी
चुकीच्या धोरणांमुळेच इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली, असे वादग्रस्त विधान करणारे केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांना लोकसभेत माफी मागावी लागली. शुक्रवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी हा मुद्दा लावून धरत गोंधळ घातला. त्यानंतर गेहलोत यांनी माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, अशा शब्दांत खेद व्यक्त केला.