आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सईद यांचे निधन, मेहबुबा मुफ्ती होणार J&K च्या पहिल्या महिला CM

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीच्या पालम विमानतळावर मुफ्ती मोहम्मद सईद यांना श्रद्धांजली देण्यासाठी गेले नरेंद्र मोदी, सोबत राजनाथसिंह. - Divya Marathi
दिल्लीच्या पालम विमानतळावर मुफ्ती मोहम्मद सईद यांना श्रद्धांजली देण्यासाठी गेले नरेंद्र मोदी, सोबत राजनाथसिंह.
नवी दिल्ली/जम्मू- जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना २४ डिसेंबरला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. ते काही दिवस जीवनरक्षक प्रणालीवर होते. मूळचे काँग्रेसचे असलेले सईद १९८७ मध्ये व्ही. पी. सिंह यांच्यासोबत गेले होते. ते १९८९ मध्ये राष्ट्रीय मोर्चा सरकारमध्ये देशाचे पहिले मुस्लिम गृहमंत्री झाले होते. त्यानंतर २००२ ते २००५ पर्यंत काँग्रेसशी आघाडी करून ते मुख्यमंत्री झाले होते. २०१५ मध्ये त्यांनी भाजपशी आघाडी केली होती आणि मार्चला ते मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे भाजपला पहिल्यांदाच राज्यात सत्तेत भागीदारी मिळाली.
सईद यांचा पार्थिव देह हवाई दलाच्या विशेष विमानाने श्रीनगरला नेण्यात आला. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बिजबिहेडा या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह देश तसेच राज्यातील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.

तत्पूर्वी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत मुफ्ती मोहंमद सईद यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पीडीपीचे राज्यपालांना पत्र
पीडीपीच्याआमदारांच्या बैठकीत मेहबूबा मुफ्ती यांची एकमताने नेतेपदी निवड झाली. त्यानंतर राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे पत्रही सादर केले. मेहबूबा राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील. त्यांचा शपथविधी कधी होणार हे मात्र लगेचच कळू शकले नाही.

कोणता होता आजार
79 वर्षीय मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एम्सच्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या रक्तातील पेशी कमी झाल्या होत्या. त्यावर एम्समध्ये उपचार करण्यात आला होता, त्यानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती.

जम्मू-काश्मीरने राष्ट्रीय नेता गमावला
सईद यांच्या निधनामुळे जम्मू-काश्मीरने एक राष्ट्रीय नेता गमावल्याची भावना व्यक्त होत असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनाने दुःख होत आहे. जम्मू-काश्मीर आणि देश त्यांचे कार्य विसरणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्यांचे शानदार नेतृत्व लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणारे ठरले.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह
त्यांच्या निधनाने अतिशय दुःख होत आहे. सर्वसामान्य लोक विशेषतः मागास समाजाविषयी त्यांचे प्रेम कायम लक्षात राहिल. जम्मू-काश्मीरच्या राजकारणाची त्यांना चांगली समज होती, खोऱ्यात शांतता राहावी ही त्यांची इच्छा होती.
कोण होते मुफ्ती मोहम्मद सईद
- जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षी 1 मार्च रोजी मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. ते राज्याचे गृहमंत्री देखिल होते.
- काश्मीरमधील राजकारणातील सईद हे मोठे प्रस्थ होते.
- काश्मीर खोऱ्यातील बिजबेहार येथे 12 जानेवारी 1936 रोजी सईद यांचा जन्म झाला होता. 1987 पर्यंत ते काँग्रेसचे सदस्य होते.
- 1987 मध्ये सईद काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांच्यासोबत गेले.
- 1989 मध्ये ते देशाचे गृहमंत्री झाले. हे पद भूषविणारे ते पहिले मुस्लिम नेते होते.
- 1999 मध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) स्थापन केली.
- 2002 ते 2005 पर्यंत काँग्रेससोबत आघाडी करून ते राज्याचे मुख्यमंत्री झाले.
- 2008 मध्ये जम्मू-काश्मारी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 18 जागा मिळाल्या.
- 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 29 जागा मिळाल्या.
- यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
मुलीचे दहशतवाद्यांनी केले होते अपहरण
मुफ्ती मोहम्मद सईद 1989 मध्ये केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर काही दिवसांनी दहशतवाद्यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलीचे - डॉ. रुबिया सईद हिचे अपहरण केले होते. तेव्हा रुबिया एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. कॉलेजहून परतताना दहशतवाद्यांनी तिचे अपहरण केले होते. तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये डॉ. फारुख अब्दुल्लांचे सरकार होते. ते लंडन दौरा अर्धवट सोडून तत्काळ भारतात परतले होते.
रुबियाला सोडण्याच्या बदल्यात दहशतवाद्यांनी तरुंगात कैद पाच दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलीच्या सुटकेसाठी पाच दहशतवाद्यांना सोडण्याची अट मान्य करण्यात आली होती, मात्र या निर्णयावर टीकेची झोड उठली होती.

का सोडली होती काँग्रेस
- 1972 ते 1975 दरम्यान मुफ्ती मोहम्मद सईद विधान परिषदेत काँग्रेसचे नेते होते. 1977 मध्ये ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते.
- त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे, की इंदिरा गांधींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत शेख अब्दुल्लांसोबत करार केला होता.
- त्यानंतर 1977 मध्ये सईद त्यांच्या पारंपरिक बिजबेहार मतदारसंघात पराभूत झाले होते. 1983 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
- त्यानंतर सईद पुन्हा नरसिंहराव यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये सहभागी झाले.
- त्यांनी पुन्हा काँग्रेस सोडली आणि 1999 मध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) स्थापन केली.
पुढील स्लाइडमध्ये, कोण असेल उत्तराधिकारी
बातम्या आणखी आहेत...