नवी दिल्ली - मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्षपद आपल्याकडे कायम राहावे म्हणून गेले पाच दिवस दिल्लीत तळ ठोकून बसलेले अॅड. जनार्दन चांदूरकर यांना निराश होऊन परतावे लागले. दलित समाजाच्या मतांवर डोळा ठेवत कॉँग्रेसने चांदूरकर यांना मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष केले होते. परंतु त्यांच्या कार्यकाळात मुंबईत कॉँग्रेसला ओहोटी लागल्याने पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसला मुंबईच्या सहाही जागा गमवाव्या लागल्या आहेत.
चांदूरकर यांनी पक्षासाठी ठोस असे काहीही केले नसल्याचा आरोप करीत कॉँग्रेसचे पदाधिकारी राजीव चव्हाण यांनी त्यांच्या पदाचा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा दिला. चव्हाण हे मुंबई कॉँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली त्यावेळी मुंबईचे माजी अध्यक्ष कृपाशंकरसिंह हेसुद्धा सोबत होते.चांदुरकरांना हटवा, अन्यथा विधनासभेच्या निवडणुकीमध्ये कॉँग्रेसचे पानिपत होईल, असा इशारा देत कृपाशंकर गटाने दिल्लीत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. चांदुरकर यांनी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, कोशाध्यक्ष मोतीलाल व्होरा आदी नेत्यांच्या भेटी घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी तीन महिन्यांवर तोंडावर असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पक्ष कोणतेही संकट ओढवून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने या नेत्यांनी चांदूरकरांकडे स्पष्ट केले.
दिव्य मराठीशी बोलताना चांदूरकर म्हणाले, पक्ष जो निर्णय घेतील तो मान्य करावाच लागेल. मात्र, बदल होणार असेल तर त्यामुळे पक्षाला खूप काही साध्य करता येईल असे वाटत नाही.