आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Janata Parivar Merger: Name And Symbol Of New Party On Sunday

जनता परिवार एक झाल्यास काँग्रेसचे एकला चलो रे !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जनता दलातील जुन्या पक्षांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया वेगात सुरू आहे; परंतु जनता दलाचे विविध पक्ष एक झाले तर काँग्रेस त्यांच्यासोबत न जाता वेगळा मार्ग निवडू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बिहारमधील पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर तसे संकेत दिले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांबाबत काँग्रेसचा दृष्टिकोन बदलला आहे. पक्षाची भूमिका त्याचेच निदर्शक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बिहारमध्ये भाजपेतर पक्षांमध्ये मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांचा चेहरा सर्वाधिक लोकप्रिय आहे. बिहारमधील पक्ष नेत्यांकडे सोनिया गांधी त्याबाबत आवर्जून विचारणा करतात. नितीशकुमार यांची राज्यात प्रतिमा कशी आहे? असा सोनियांचा प्रश्न असतो.
भाजपविरोधी मतदान एकगठ्ठा करण्याची कुवत त्यांच्यात आहे का? बिहारचे मुख्यमंत्री म्हणून लालूप्रसाद यादव यांचे नाव चर्चेत आणण्याची त्यांची इच्छा नाही. याचे कारण लालूप्रसाद यादव खटल्यांमध्ये अडकल्याने तूर्तास ते या पदावर येऊ शकत नाहीत.

वास्तविक संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची ग्वाही दिलेली असली तरीही जनता परिवाराच्या विलीनीकरणाबाबत साशंक वातावरण कायम आहे. विलीनीकरण की निवडणूकपूर्व युती, असा हा संभ्रम आहे. युती करण्याची वेळ आली तर काँग्रेस त्यांचा वाटा घेऊन आनंदाने जनता परिवारासोबत जायला तयार आहे; परंतु एखादेवेळी जदयू व राजद वेगवेगळे निवडणुकीत उतरले तर काँग्रेस जदयूसोबत जाऊ शकते.
कारण त्यांच्यात समझोता झालेला आहे. जनता परिवार एक झाल्यास अल्पसंख्याक समाज दुरावला जाऊन काँग्रेसच्या मागे येऊ शकतो, असे पक्षाचे आकलन आहे. त्यामुळे काँग्रेस जनता परिवारापासून अंतर राखण्याच्या मानसिकतेत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला पराभूत करण्याची इच्छा व क्षमता असलेले नेते अथवा पक्ष एक होतील. त्यांचा प्राधान्यक्रम जनता दल, राजद अथवा काँग्रेस असाच राहील. त्याचाही पक्षाला लाभ होऊ शकतो. काँग्रेसमध्ये यासाठीही उत्साही आहे की, मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपबाबत लोकांमध्ये निराशेचे वातावरण तयार होत आहे. त्याचाही लाभ घेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

बिहारमधील काही काँग्रेस नेते पक्षाने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवाव्यात आणि त्याची तयारी आतापासूनच करावी या भूमिकेचे आहेत. आघाडी होणार असली तरीही पक्षाने निवडणूक लढवायच्या जागा ठरवून त्या ठिकाणी तयारी करावी, असा नेत्यांचा आग्रह आहे. त्या दृष्टिकोनातून राज्यात काँग्रेसची सक्रियता वाढली आहे.