आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनलोकपाल विधेयक: अण्णा जनलोकपाल विधेयक मान्य, सरकारचे मानले आभार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/राळेगणसिद्धी - जनलोकपाल विधेयक आता मंजूर होण्याच्या वाटेवर अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी राज्यसभेत यावर चर्चा होणार असली तरी सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप विधेयकाच्या पाठीशी असल्याने ते मंजूर होण्याचा मार्ग मोकळा असल्याचे दिसत आहे. राळेगणसिद्धीत जनलोकपालसाठी उपोषण करणारे अण्णा हजारे यांनीही नव्या विधेयकातील तरतुदींबद्दल समाधान व्यक्त केले असून सरकारला धन्यवाद दिले आहेत. त्यामुळे सोमवारी विधेयक राज्यसभेत मंजूर होताच अण्णा उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे.
नाट्यमय घडामोडी :लोकपाल विधेयकावर सोमवारी राज्यसभेत चर्चा होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच शनिवारी राजधानी दिल्लीत नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सायंकाळी साडेपाच वाजता तीन मंत्र्यांसह पत्रकार परिषद घेतली. लोकपाल विधेयक देशाची गरज असल्याचे सांगून सर्व पक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राहुल यांची पत्रकार परिषद संपत नाही तोवर राळेगणसिद्धीमध्ये अण्णा यावर बोलले. राज्यसभेत सादर विधेयकाची वैशिष्ट्ये सांगत त्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. हे विधेयक मंजूर होताच उपोषण मागे घेण्याची घोषणाही त्यांनी केली. यानंतर काही वेळाने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी कोणत्याही चर्चेविना हे विधेयक मंजूर करण्याची भाजपची तयारी असल्याचे जाहीर केले. एकीकडे सरकारने मांडलेल्या लोकपाल विधेयकाला पाठिंबा असा वाढत चालला असताना लोकपाल आंदोलनातूनच उगम पावलेल्या आम आदमी पार्टीने विधेयकाला विरोध जाहीर केला. सरकारी लोकपाल विधेयक अण्णांनी मान्य कसे केले याचेच आश्चर्य वाटते, असे ट्विट करून अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली. हे विधेयक तर जोकपाल असल्याचे सांगत अण्णांची दिशाभूल कोण करत आहे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘आप’च्या विजयाचा संबंध नाही : राहुल
एक सक्षम लोकपाल विधेयक मंजूर करण्याचा मानस आहे. याचे 99 टक्के काम पूर्ण झाले. आता उर्वरित काम राजकीय पक्षांनी करावयाचे आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. अण्णांचे उपोषण आणि आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील विजयाचा आणि लोकपाल विधेयक अधिवेशनात मांडले जाण्याचा संबंध नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले. या वेळी राहुलसोबत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, कायदा मंत्री कपिल सिब्बल आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी होते.
दिल्लीत लगबग!
सायंकाळी 5.30 वा. : राहुल गांधी म्हणाले, लोकपाल विधेयक देशाची गरज आहे. सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी सहकार्य करावे.
सायंकाळी 5.45 वा. : अण्णा म्हणाले, राज्यसभेत सादर होत असलेले विधेयक योग्य आहे. पुढचे पुढे पाहू.
रात्री 7.15 वा. : भाजप नेते अरुण जेटली यांनी हे विधेयक चर्चेविना मंजूर करण्याची तयारी दर्शवली.
‘आप’चा युक्तिवाद : अण्णांच्या तीन महत्त्वाच्या मागण्यांपैकी एकही मान्य करण्यात आलेली नाही. तरीही अण्णांच्या भूमिकेचे आश्चर्य वाटते.