आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगडच्या नक्षली हल्लयात, विदर्भातील 3 जवानांचे समर्पण, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती/नागपूर- छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात १२ जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश अाहे. विदर्भातील त्यांच्या मूळ गावी रविवारी शासकीय इतमामात या जवानांना अखेरचा निराेप देण्यात अाला. 

>हातमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या मेंढे कुटुंबीयांचा आधार काेसळला
वर्धा जिल्ह्यातील सोनाळा ढोक नावाचे एक लहानसे खेडे... गावात वास्तव्य असले तरी घरी शेतजमीन नाही... दैनंदिन हातमजुरीवरच कुटुंबाची रोजीरोटी अवलंबून.. गरिबी म्हणजे काय असते याचा पदोपदी अनुभव घेत मेंढे कुटुंबाचा दिवस उजाडायचा..  एकटे वडीलच कमावते होते. राजेश, अमोल आणि प्रेमदास ही तीन भावंडे. वडिलांना हातभार म्हणून तिघेही गावात मजुरीच्या शोधात असायचे. कधी शेतीची कामे तर कधी अन्य काही रोजगार. मात्र गाव लहान असल्याने राेजच काम मिळेल याची शाश्वती नव्हती, त्यामुळे उत्पन्नही जेमतेमच हाेते. 

वडील रामदास मेंढे हे आजही ७२ व्या वर्षी अंगमेहनतीचे कामकाज करतात. भाऊ राजेश हासुद्धा रोजंदारीतून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातूनच घर चालवतो. दुसरा भाऊ अमोल हा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतो.   
 
लष्करात दाखल होण्याची लहानपणापासूनच इच्छा असलेल्या प्रेमदासला (वय ३८) पंधरा वर्षांपूर्वी केंद्रीय राखीव दलात संधी मिळाली. पॅरामिलिट्री सर्व्हिसेसमध्ये ताे भरती झाला. देशसेवेची संधी आणि हातमजुरीवर जगणाऱ्या कुटुंबाला हातभार लावणे या दोन्ही बाबींचा विचार करून प्रेमदासने ही नाेकरी पत्करली.  शनिवारी छत्तीसगडमध्ये झालेल्या  नक्षली हल्ल्यात ताे देशाच्या कामी अाला. रविवारी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात अाले.  या वेळी पुलगाव येथील स्मशानभूमीत माेठ्या संख्येने लाेक जमले हाेते. बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.  मुलगी गुंजन आणि मुलगा आर्यन यांनी पित्याच्या चितेला भडाग्नी दिला. 

‘लवकरच येईन’ म्हणणारा प्रेमदास अाता येणार नाही..!
प्रेमदास अतिशय मनमिळाऊ आणि हसतमुख स्वभावाचे होते. अत्यंत गरीब परिस्थितीतून ते आले होते. यापूर्वी त्यांनी गडचिरोली, श्रीनगर, पुणे, तळेगाव येथे काम केले. दोन वर्षांपूर्वीच त्यांची छत्तीसगड येथे बदली झाली होती. मागच्या महिन्यातच ते भेटीसाठी घरी आले होते. १९ फेब्रुवारी राेजी सुटी संपवून ते पुन्हा देशकार्यात रुजू झाले हाेते.  ‘पुन्हा लवकरच येण्याचा प्रयत्न करेन..’ असे सांगत त्याने कुटुंबीयांचा निराेप घेतला हाेता. मात्र, आता तो पुन्हा येणार नसल्याच्या जाणिवेने कुटुंबीय खचले अाहेत.
 
> बालपांडे कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला  
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मंगेश बालपांडे (३५) हा जवानही शनिवारी छत्तीसगडमध्ये नक्षलींच्या हल्ल्यात शहीद झाला. बालपांडे कुटुंबातील ताे एकमेव कर्ता पुरुष. अवघ्या नऊ महिन्यांचा मुलगा, चार वर्षांची मुलगी, पत्नी आणि आई असे बालपांडे यांचे छोटेखानी कुटुंब. वर्षभरापूर्वी मंगेशची काश्मीरमधून छत्तीसगडमध्ये बदली झाल्यावर त्याचे कुटुंबीय अानंदी हाेते.
 
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सुकमा येथील तळावर पोस्टिंग असलेला मंगेश वेळ मिळेल तेव्हा कुटुंबाशी दूरध्वनीवर संपर्क साधून आपल्या चिमुकल्यांची माहिती घ्यायचा. मात्र अाता हे कुटुंबच पाेरके झाले अाहे. रविवारी शासकीय इतमामात मंगेशवर अंत्यसंस्कार करण्यात अाले. त्याचा मुलगा खूपच लहान असल्याने मंगेशच्या काकांनी त्याला मुखाग्नी दिला. त्याला निरोप देण्यासाठी तुमसरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. ‘मंगेश अमर रहे’चे बॅनर जागोजागी झळकत होते.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, गुड्डूचे स्वप्न अधुरे; स्मारक उभारणार...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...