आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षांनंतर निकाल; आता सिद्ध झाले, अम्मा अाणि चिन्नम्मांची संपत्ती 541 टक्‍क्‍याने वाढली होती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ चेन्नई - मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चिन्नम्मांचा (शशिकला) मार्ग सुप्रीम कोर्टाने किमान १० वर्षांसाठी बंद केला. बेहिशेबी संपत्ती प्रकरणात त्यांना दोषी ठरवले. त्यांना ४ वर्षे तुरुंगवास व १० कोटी रुपये दंडही ठोठावला. २१ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात विशेष न्यायालयासह सुप्रीम कोर्टापर्यंत सुनावणी झाली. मुद्दा एकच होता, अम्मा व चिनम्मांकडे किती बेहिशेबी संपत्ती आहे.
 
विशेष न्यायालयाने ही संपत्ती कमाईपेक्षा ५४१% जास्त असल्याचा तर्क मांडला, तर हायकोर्टाने ८.१२% अधिक असल्याचे सांगत शिक्षा होऊ शकत नसल्याचा निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने मात्र विशेष न्यायालयाचेच म्हणणे ग्राह्य धरले. शशिकलांसोबत त्यांचे दोन नातेवाईक इलावारसी आणि सुधाकरन यांनाही ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शशिकलांसह सर्व दोषी बुधवारी कोर्टात आत्मसमर्पण करतील. शेजारी असलेल्या तुरुंगातच त्यांना राहावे लागेल.
 
१९९१ ते १९९६ दरम्यान कमावलेल्या मालमत्तेचे प्रकरण...
सत्र न्यायालयाने तपासलेले दस्तऐवज उच्च न्यायालयाने पाहिले नसल्याचे सर्वाेच्च न्यायालयाने सांगितले. केवळ बचाव पक्षाचे प्राप्तिकर विवरण पाहिले गेले. शशिकला एवढ्या संपत्तीचे स्रोत सांगू शकल्या नाहीत.
 
सत्र न्यायालय म्हणाले - उत्पन्न १० कोटी रु. व संपत्ती ६७ कोटी रु. म्हणजे ५४१% जास्त
सत्र न्यायालय म्हणाले, ५ वर्षांत जयललिता यांची संपत्ती ६३.५१ कोटी रु. अाणि उत्पन्न ९.९१ कोटी रु. होते. म्हणजे ५३.६० कोटींचा हिशेब नाही. त्यामुळे ५४१% बेहिशेबी. 
 
उच्च न्यायालयाने उत्पन्न ३५ कोटी केले व संपत्ती ३८ कोटी असे ८.१२% जास्त 
उच्च न्यायालयानुसार, मालमत्ता ३७.५९ कोटी व उत्पन्न ३४.७६ कोटी रु. होते. केवळ २.८२ कोटी रुपयांचा(८.१२%) हिशेब नाही. बेहिशेबी संपत्ती १० % पेक्षा कमी असेल तर शिक्षा होऊ शकत नाही.
 
सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले, सेशन कोर्टाचे निष्कर्षच योग्य आहेत
हायकोर्टाने  चूक केल्याचे सर्वाेच्च न्यायालयाने मान्य केले. सत्र न्यायालय योग्य. त्यामुळ त्यांचाच निकाल कायम ठेवला जावा.
 
सरकारी वकिलाने केलेल्या युक्तिवादात आरोपींचे उत्पन्न १६.९२ कोटी रु. व उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती ३५.७३ कोटी रु. असल्याचे म्हटले होते. म्हणजे बेहिशेबी संपत्ती २११% जास्त आहे. सर्वाेच्च न्यायालयाने ही बाबही ग्राह्य धरली.
 
सुप्रीम कोर्टाने जयललितांनाही माफ केले नाही; म्हटले- जयांनी सुटण्यासाठी शशिकलांच्या नावे पॉवर आॅफ अॅटर्नी लिहिले
{ जयललिता यांनी जया पब्लिकेशनची पॉवर ऑफ अॅटर्नी शशिकला यांना दिली. त्या शशिकला यांच्याद्वारे स्वत:चा बचाव करू इच्छित होत्या. गैरमार्गाचा पैसा शशिकला पब्लिकेशनमध्ये गुंतवेल हे त्यांना माहीत होते.
{ पैसा कमावण्यासाठी १ दिवसात दहा फर्म स्थापन.गुन्हेगारी कट रचला. शशिकला, इलावरसींनी मालमत्ता खरेदी केली. त्यांनी व्यवसाय केला नाही.
{ शशिकला जयांसोबत होत्या हे त्यांच्या कामातून दिसते. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्स्फरचा व्यवहार सांगतो की पैसा कमावण्यासाठी कसा कट रचला गेला.
{ सर्व कंपन्या जयांचे घर पोएस गार्डन येथून चालत होत्या. त्यांच्या घरातून शशिकला व नातेवाईक काय करत आहेत हे जयललितांना माहीत नव्हते काय?
 
पुढे काय?
राज्यपाल संयुक्त शक्तिपरीक्षण करण्याचा आदेश देऊ शकतात
राज्यपाल संयुक्त शक्तिपरीक्षणाचा आदेश देऊ शकतात. त्यासाठी त्यांनी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी, घटनातज्ज्ञ सोली सोराबजी आणि माजी सॉलिसिटर जनरल मोहन पराशर यांचे मत आजमावले. उत्तर प्रदेशात १९९८ मध्ये हेच घडले होते. जगदंबिका पाल व कल्याणसिंह यांच्यात तेव्हा वाद होता. 

पलानीसामी यांनी राज्यपालांना १२४ आमदारांची यादी सोपवली
पन्नीरसेल्वम यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. १२४ आमदारांची यादी सोपवणारे पलानीसामी यांना राज्यपाल संधी देऊ शकतात.
 
शशिकला आज सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार?
शशिकला बुधवारी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करू शकतात. खासदार थंबीदुराई यांनी ही माहिती दिली.
 
जयांसारख्या शशिकला, बेहिशेबी राजकीय नाट्य
चिन्नम्मांना कोर्टाने अडवले...
शशिकलांना मुख्यमंत्री व्हायचे होते. पन्नीरसेल्वम त्यांना रोखू पाहत होते. मात्र, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि शशिकलांना ४ वर्षे तुरुंगवास ठोठावण्यात आला. ४ वर्षांची कैद म्हणजे ६ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, १० वर्षे मुख्यमंत्री होता येणार नाही. चिन्नमा गटात सन्नाटा, पन्नीरसेल्वम गटात आनंद...
 
... मग चिन्नम्मांनी पन्नीरना रोखले
पन्नीर यांच्या मार्गातील मुख्य काटा सुप्रीम कोर्टाने काढलाच होता. आता तेच मुख्यमंत्री होणार असे वातावरण होते. मात्र शशिकलांनी तत्काळ पन्नीर आणि त्यांच्या समर्थकांना पक्षातून काढून टाकले. पलानीसामी या निष्ठावंतास नेता घोषित केले. जयललिता यांनीही तुरुंगात जाताना पन्नीर यांना याच पद्धतीने नेता जाहीर केले होते.
 
पन्नीर पलानींना रोखू शकतील? 
सत्तेसाठी सुरू असलेली ही स्पर्धा अजून थांबलेली नाही. शशिकला तुरुंगात गेल्यानंतर पन्नीरसेल्वम आता पलानीसामी यांच्या अडचणी वाढवतील. पक्षातील बहुतांश आमदार पन्नीर यांच्या बाजूने येऊ शकतील. पक्षात फूटही पडू शकते. येत्या दहा दिवसांत राजकीय चित्र आणखी स्पष्ट होईल.
बातम्या आणखी आहेत...