आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पदवीचा आरोप निराधार : जितेंद्र सिंह तोमर, CM केजरींना दिले पत्राद्वारे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कायद्याच्या पदवीवरून वादग्रस्त ठरलेले दिल्लीचे विधीमंत्री जितेंद्र सिंह तोमर यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवून त्यांची पदवी बनावट असल्याचा आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. हा आरोप पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी केला जात असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. भाजपचे नेते नंदकिशोर गर्ग यांच्या विरोधात न्यायालयामध्ये अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी केजरीवाल यांना सांगितले. विशेष म्हणजे गर्ग यांनीच तोमर यांच्या विरोधात पदवीच्या प्रामाणिकतेबाबत न्यायालयात आव्हान दिले आहे.

तोमर यांनी याप्रकरणी स्वत:ची भूमिका स्पष्ट करावी, असे केजरीवाल यांनी मागील मंगळवारी त्यांना सांगितले होते. विधानसभेची जागा गमावण्याच्या भीतीपोटी नंदकिशोर गर्ग यांनी मला बदनाम केले. त्यांनी यासाठी गलिच्छ राजकारण केले, असे तोमर यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. राजकारण अपयशी ठरत असल्याने अखेर गर्ग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पदवीच्या प्रामाणिकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. गर्ग यांनी सादर केलेले दस्तऐवज चुकीचे असल्याचा दावादेखील तोमर यांनी केला. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात गर्ग यांचे काही विद्यापीठ असून, त्या माध्यमातून ते चुकीची माहिती देऊन काही दस्तऐवज हस्तगत केले आहेत. ते चुकीचे दस्तऐवज पुरावा म्हणून निवडणूक याचिकेत सादर केले आहेत.
भाजपचे वरिष्ठ नेते खोट्याचा आधार घेऊन माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे तोमर यांनी सांगितले. हे नेते आधारहीन आरोपांच्या माध्यमातून पक्षाला कलंकित करण्याचा प्रयत्न करत अाहेत, असेही त्यांनी सांगितले. सत्य समोर येईल आणि उच्च न्यायालयात दस्तऐवज सादर केल्यावर याचिका निश्चितपणे फेटाळली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोणी दाखल केली याचिका
अवध येथील डॉ. राममनोहर लोहिया विद्यापीठातून प्राप्त माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशच्या गाझियाबादचे रहिवासी प्रदीप यांनी याचिका दाखल केली. रोल नंबर ३१३३१ अंतर्गत जितेंद्र सिंह तोमर यांची पदवी बनावट असल्याची माहिती विद्यापीठाने दिली. प्रदीप यांनी मागितलेल्या माहितीचे उत्तर ३० वर्षे जुन्या रेकॉर्डवर आधारित असून, ते केवळ एकाच दिवसात दिल्याकडेही तोमर यांनी लक्ष वेधले. गर्ग यांचे वकील दीपक व्होरा यांनी अयोध्या येथील पी. जी. कॉलेजमध्ये माहिती अधिकारांतर्गत मागितलेल्या माहिती अर्जाची प्रतही तोमर यांनी संलग्न केली आहे.

काँग्रेसने केली तोमर यांना हटवण्याची मागणी
नवी दिल्ली । कथित बनावट पदवीप्रकरणी दिल्लीचे विधीमंत्री जितेंद्र सिंह तोमर यांना पदावरून हटवण्याची मागणी करताना काँग्रेसने आक्रमक भूमिका कायम ठेवत गुरुवारी निदर्शने केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडथळे तोडून दिल्ली सचिवालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला. दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अजय माखन यांनी या निदर्शनांचे नेतृत्व केले. दिल्ली सरकार तोमर यांना पदावरून हटवत नाही, तोपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असे माखन यांनी स्पष्ट केले. ‘जोपर्यंत विधीमंत्र्यांना पदावरून हटवले जात नाही, तोपर्यंत आंदोलन कायम राहील. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी केली. भाजपनेही याप्रकरणी बुधवारी केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली होती.