आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JNU Row: Delhi High Court Adjourns Hearing On Kanhaiya Kumar

जेएनयू वाद : कन्हैयाकुमारचा जामीन; आता सोमवारी सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या देशद्रोहाच्या आरोपाखालील अटकेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी बुधवारी जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारच्या जामीन अर्जास विरोध केला. त्यामुळे उच्च न्यायालयाने कन्हैयाच्या जामीन अर्जावरील सुनावणी २९ पर्यंत लांबणीवर टाकली. दरम्यान, उमर खालिद आणि अनिर्बान यांची पाच तास चौकशी करण्यात आली.

जेएनयू वादाच्या नव्या घडामोडीत कन्हैयाची १५ दिवस कोठडी वाढवून देण्याची मागणी अतिरिक्त महाधिवक्ता तुशार मेहता यांनी न्यायालयाकडे केली. कन्हैया आणि उमर अर्निबान यांची समोरासमोर चौकशी करण्याची आवश्यकताही व्यक्त करण्यात आली. मेहता यांनी यानंतर सुनावणी लांबणीवर टाकण्याची मागणी केली. न्यायपीठाने या प्रकरणाची सुनावणी २९ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी कन्हैयाची बाजू मांडली. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सादर केलेल्या अहवालात कन्हैयाने कोणतीही देशविरोधी घोषणा दिल्याचा पुरावा सापडला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या अहवालाच्या आधारावर कन्हैयाला जामीन मिळावा,अशी मागणी सिब्बल यांनी केली. नवीन घटनाक्रम अाणि पुराव्यामुळे कन्हैयाची कोठडी आवश्यक असल्याचे मेहता यांनी सांगितले. कन्हैयाला १२ फेब्रुवारी रोजी अटक केली.

दरम्यान, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांची अटकेपूर्वी पाच तास चौकशी करण्यात आली. देशद्रोहाच्या प्रकरणात कन्हैयाच्या अटकेनंतर दोघे कुठे होते याची विचारणा त्यांच्याकडे करण्यात आली. संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूच्या मृत्यूदिनाचे कार्यक्रमाच्या आयोजनात दोघांचा कितपत सहभाग होता. कार्यक्रमस्थळी त्यांनी देशविरोधी घोषणाबाजी केली काय,याची चौकशीही पोलिसांनी केली.

या प्रकरणात आणखी तीन विद्यार्थ्यांच्या शरणागतीची वाट पाहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी रात्री खालिद आणि अनिर्बान शरण आल्यानंतर त्यांना चौकशीसाठी अज्ञातस्थळी नेण्यात आले. खालिद आणि अनिर्बान यांच्याव्यतिरिक्त नागा, अाशुतोश आणि प्रकाश यांच्याविरुद्ध २० फेब्रुवारी रोजी लुकआऊट नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणाची देशभरात चर्चा आहे.

कन्हैयाकडूनच कार्यक्रमाचे आयोजन
कन्हैयाकुमार केवळ राष्ट्रविरोधी घोषणाबाजी होत असलेल्या कार्यक्रमात सहभागी झाला नाही, तर त्याने त्याचे आयोजनही केले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली. न्या. प्रतिभा राणी यांच्यासमोर १३ पानी अहवाल सादर करण्यात आला. कन्हैया आणि अन्य दोन व्यक्तींशिवाय जेएनयूच्या कार्यक्रमात काही विदेशी तत्त्वेही होती. ओळख लपवण्यासाठी त्यांनी चेहऱ्यावर मुखवटा घातला होता. घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले.

(फोटो : जेएनयूच्या मुद्द्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जंतरमंतरवर निदर्शने केली. रामलीला मैदानावरून मोर्चाही काढला.)