नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग यांच्यात सरकारी फाइल्सच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद होत असल्याचे समोर आले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिला होता की, काही फाईल्स या लेफ्टनंट गव्हर्नर यांच्याकडे पाठवण्यापूर्वी त्यांच्याकडे यायला हव्यात. पण जंग यांनी हा आदेश मागे घेण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांनी घटना आणि संबंधित नियमांचे पालन करावे, अशा संदेश एलजी यांच्या कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला पाठवण्यात आला.
माध्यमातील वृत्तानुसार,
केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांना पोलिस विभाग, पब्लिक ऑर्डर आणि जमिनींशी संबंधित ठरावीक विषयाच्या फाईल त्यांच्याकडे पाठवाव्या आणि नंतर नायब राज्यपालांकडे पाठवल्या जाव्यात, असे सांगितले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या विविध विभागांना याबाबत निर्देश दिले होते. त्यात सर्व फाईल्स पाठवून राज्यपालांना त्रास दिला जावू नये, असे म्हटले होते. त्यातून सरकारची कार्यक्षमता वाढेल असे केजरीवाल यांचे म्हणणे होते. या आदेशाचा सरळ अर्थ असा होता की, केजरीवाल दिल्ली पोलिस आणि दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या प्रकरणात थेट हस्तक्षेप करू इच्छितात. हे विषय केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नायब राज्यपालांच्या विशेषाधिकारात येतात.