आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - आम आदमी पार्टी हा पोरासोरांचा खेळ आहे. माध्यमांनीच त्याला मोठे केले आणि आता त्यांच्या मागे लागला आहात. त्यामुळे त्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस हेही बदनाम पक्ष आहेत. तळागाळातील लोकांना न्याय मिळावा म्हणून माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत आणि मी राष्ट्रीय लोकशासन पक्षाची स्थापना केली असून महाराष्ट्रातून 48 जागांवर लोकसभेचे उमेदवार लढवणार असल्याची माहिती माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
कोळसे पाटील यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय पक्षासाठी अर्ज केला आहे. लवकरच पक्षाला निवडणूक चिन्हही मिळेल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 47 व्या वर्षीच मी नोकरीचा राजीनामा दिला. संत गाडगेबाबांच्या पद्धतीने मी काम करीत असतो; परंतु राज्यात कोणाचेही सरकार असो, सामान्य माणसांना न्याय मिळत नाही याची मला प्रचिती आली आहे, त्याचे मला दु:ख आहे. प्रत्येक सरकारने कल्याणकारी योजना जाहीर केल्या; परंतु त्या राबवल्या गेल्या नाहीत; किंबहुना त्या लोकांपर्यंत कशा पोहोचणार नाहीत असेच प्रयत्न झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत आम्ही शंभरावर सभा घेतल्या. प्रत्येक ठिकाणी 25 हजार ते 1 लाख लोक हजर होते. बेलदार, चर्मकार, मातंग, रामोशी, बौद्ध, आदिवासी, कोळी आदी समाजांतील लोकांची गर्दी सभांना असते. मराठा लोक आमच्या सभांकडे पाठ फिरवतात, त्यांना शरद पवार हेच प्रिय नेते आहेत.
पृथ्वीराज चव्हाण हे बिनकामाचे आहेत. स्वच्छ प्रतिमेचे म्हणून नाकाने कांदे सोलतात आणि बिल्डरांना जागा मिळवून देतात, अशी टीका कोळसे यांनी केली. उद्या पारनेर येथे जेलभरो करू. 10 मार्च रोजी यवतमाळ येथे होणार्या सभेत लाखावर लोक येतील, तिथेच त्यांचा लोकसभेचा उमेदवार ठरवला जाणार आहे. राज्यातील 100 सभांमध्ये प्रत्येकाने शपथ घेतली आहे, जो उमेदवार पैसे देईल त्याला मतदान करायचे नाही! तर आमच्या उमेदवाराचा प्रचार मतदारच वर्गणी गोळा करून करतील.
राज्यातील सरकार ‘नालायक’ असल्याचा आरोप करीत एन्रॉन, डाऊ, मुंबईचा सेझ (अंबानींविरोधात) अशा किती तरी आंदोलनांची नावे कोळसे यांनी घेतली. लोकशासन पक्ष सामान्यांना न्याय देण्यासाठीचा योग्य पर्याय असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हा पक्ष पहिल्यांदा केवळ महाराष्ट्रातूनच निवडणुका लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठय़ांकडून फसवणूकच
गेली 60 वर्षे मराठय़ांनी लोकांची फसवणूक केली. आता हेच मराठे आरक्षणाची गोळाबेरीज करताना दिसतात; परंतु घटनेप्रमाणे मराठय़ांना आरक्षण देताच येत नाही. विनायक मेटे हे शरद पवारांचे खास आहेत. मराठय़ांचे आरक्षण म्हणजे मतांसाठीचा डाव आहे. हे आरक्षण केंद्राला कायद्यात बदल करून द्यावे लागेल, राज्याला तसा कोणताही अधिकार नाही. लोकांनी सावध व्हावे, असे कोळसे पाटील म्हणाले.
कोळसे पाटील यांच्या पाठीमागे कोण?
‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी रिलायन्सवर एफआयआर नोंदवला होता. या पक्षावर टीका करणारे कोळसे पाटील आज राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचे निमंत्रण र्शीपाद चिंचनसूरकर यांनी दिले. ते ‘रिलायन्स’मध्ये काम करतात. त्यामुळे लोकशासन पक्षाच्या मागचे ‘ब्रेन’ रिलायन्सचा तर नाही ना? या प्रश्नावर न्या. कोळसे पाटील म्हणाले की, र्शीपाद चिंचनसूरकर हे माझे मित्र आहेत. ते रिलायन्समध्ये काम करतात तो केवळ योगायोग असल्याचा खुलासा त्यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.