नवी दिल्ली - औद्योगिक विकासाच्या बाबतीत देशात अव्वल असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत पिछाडीवर आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशातील ‘टॉप-१० स्वच्छ शहरां’च्या यादीत महाराष्ट्रातील नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला. राज्यातील अन्य एकाही शहराला टॉप-१० च्या यादीत स्थान मिळालेले नाही. उलट कर्नाटकच्या चार शहरांनी या यादीत स्थान मिळवले असून पहिला क्रमांक पटकावणारे म्हैसूर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.
स्वच्छ भारत मोहिमेला मिळालेल्या यशाच्या चाचपणीसाठी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानंतर ही यादी जाहीर केली आहे. राजधानीची शहरे गटात बंगळुरू अव्वल ठरले आहे.
टॉप-१० स्वच्छ शहरे
म्हैसूर (कर्नाटक), तिरुचेरापल्ली (तामिळनाडू), नवी मुंबई (महाराष्ट्र), कोची (केरळ), हसन, मंड्या, बंगळुरू (कर्नाटक), थिरुवनंतपुरम (केरळ), हली साहर (प. बंगाल), गंगटोक (सिक्कीम)