आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्ती चिदंबरम यांनीही केले नरेंद्र मोदींचे कौतुक, मोदी स्तुतीवरून काँग्रेस पुन्हा अस्वस्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली । चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याचे काँग्रेस पक्षात सुरू झालेले सत्र थांबण्यास तयार नाही. पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांच्या मोदी स्तुतीवरून सुरू झालेला
वाद अद्याप शमलेला नसतानाच माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांनी मोदींच्या राजकीय क्षमतेचे कौतुक केले. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे.
तामिळनाडू काँग्रेसने कार्ती चिदंबरम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून ३०
जानेवारीच्या आता स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. कार्ती यांनी गुरुवारी त्यांच्या
समर्थकांसमोर बोलताना मला मोदी अजिबात आवडत नाहीत. परंतु त्यांच्या राजकीय
क्षमतेला दाद द्यावीच लागेल, असे म्हटले होते.

कार्ती हे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आहेत. काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारीदेखील दिली होती. परंतु ते पराभूत झाले होते. गुरुवारी आपल्या समर्थकांच्या बैठकीत बोलताना कार्ती म्हणाले, तुम्ही त्यांना (मोदींना) पसंत करा अथवा न करा. मला तर ते बिल्कूल आवडत नाहीत. परंतु तुम्हाला त्यांच्या राजकीय क्षमतेचे कौतुक करावेच लागेल. त्यांनी कशा प्रकारे स्वत:ची प्रतिमा निर्माण केली, पक्षाला आपल्या सोबत घेऊन ते कसे पुढे गेले हे बघावे लागेल. मोदींच्या पक्षकार्यापासून बोध घेऊन तुम्हीही काँग्रेससाठी तसे काम करा, असे त्यांचे
कार्यकर्त्यांना सांगणे होते.

परंतु कॉंग्रेसला त्यांची ही स्तुतीदेखील आवडलेली नाही. तामिळनाडू काँग्रेसने याप्रकरणी कार्ती यांना नोटीस बजावली असून त्यांना ३० जानेवारीपर्यंत खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे.याआधी माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना मोदींची स्तुती करणे महागात पडले व पक्ष प्रवक्तेपद सोडावे लागले होते. या शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांच्यावरही काँग्रेस स्तुती प्रकरणात कारवाईची टांगती तलवार आहे.

द्विवेदींचा खुलासा, तरीही वाद
काँग्रेसचे सरचिटणीस द्विवेदी यांनी बुधवारी एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, "मोदींनी देशात नव्या युगाची सुरुवात केली आहे. लोकांना समजून घेण्यात ते यशस्वी ठरले. ते लोकांच्या जवळ आहेत व त्यांचा विजय हा भारतीयत्वाचा विजय आहे.'' परंतु पक्षाने हे वक्तव्य गांभीर्याने घेतल्यानंतर त्यांनी मला कुणी भारतीयत्व शिकवू नये. मोदी भारतीयीत्वाचे प्रतिक कधीच होऊ शकत नाहीत, असे म्हटले होते. त्यावरुन वाद झाल्यानंतर अजय माकन यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन द्विवेदींच्या विधानावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

द्विवेदी वाद संपलेला नाही : माकन
मोदी स्तुती प्रकरणात द्विवेदी यांच्यावरील कारवाईबाबत असलेले मतभेद शुक्रवारी पुन्हा स्पष्ट झाले. पक्षाचे प्रवक्ते पी. सी. चाको यांनी द्विवेदी प्रकरण संपल्याचा खुलासा केला. तर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अजय माकन यांनी चाको यांना कदाचित याची माहिती नसावी. हा वाद पक्षश्रेष्ठींच्या विचाराधीन आहे. तेच यावर निर्णय घेतील. मी जे सांगत आहे तीच काँग्रेसची भूमिका असून तोच अंतिम शब्दही आहे. कार्ती चिदंबरम यांच्यावरही कारवाई केली जाणार का? या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.