आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा हजारेंच्या प्रश्नांना केजरीवालांकडून उत्तर, अण्णा यांनी विचारले होते तीन प्रश्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना रविवारी पत्र पाठवून तीन प्रश्न विचारले होते. त्यावर केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तरे दिली. या वेळी पक्षाचे प्रशांत भूषण, मनीष शिसोदिया यांचीही उपस्थिती होती.
पहिला प्रश्न : जनलोकपाल विधेयक पारित करण्याचा दावा दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कसा काय करू शकते.
आपचे उत्तर : मी, प्रशांत भूषण आणि इतर सहकारी आम्हा सर्वांना कायद्यातील बारकावे माहिती आहेत. दिल्ली विधानसभेच्या अधिकारक्षेत्रात येईल तेच विधेयक आम्ही पारित करू. दिल्लीचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचारी सर्व त्याच्या कक्षेत येतील.
दुसरा प्रश्न : निवडणूक प्रचार आणि निधी उभारण्यासाठी आपला पक्ष माझ्या नावाचा वापर तर करत नाही ना?
आपचे उत्तर : कोण आणि कोणत्या हेतूने आपल्यापर्यंत अशा गोष्टी आणत आहे हे ठाऊक नाही. आपल्या सूचनांचे पूर्णपणे पालन केले जात आहे. ‘अण्णा कार्ड’बाबत म्हणत असाल तर आपला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. जनलोकपाल आंदोलनाच्या वेळी तुमच्या संमतीनेच हे कार्ड काढण्यात आले होते. पक्ष काढण्याच्या घोषणेआधीच अण्णा कार्डची विक्री बंद करण्यात आली होती.
तिसरा प्रश्न : जनलोकपालच्या काळात किती पैसा जमला? त्याचा वापर निवडणुकीसाठी तर होत नाही ना?
आपचे उत्तर : आयकर काद्यानुसार आम्ही आंदोलनाचा पैसा निवडणुकीत वापरू शकत नाही. केल्यास कठोर कारवाई होऊ शकते. जनलोकपाल आंदोलनाच्या वेळी जमा झालेल्या रकमेच्या खर्चाबाबत विचाराल तर हे सर्वात वेदनादायी आहे. आपण पाठवलेल्या विशेष पथकानेही त्याचे ऑडिट केले आहे. त्यानंतरही जर आपल्या मनात काही शंका असेल तर तपास करून आठवडाभरात आपल्याला अहवाल द्यावा, अशी विनंती मी न्यायमूर्ती हेगडे यांना करतो.
अण्णांना आव्हान
उत्तरादाखल केजरीवाल यांनी अण्णांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझ्यावरील कोणताही आरोप खरा ठरला तर दिल्ली विधानसभा निवडणुकीतील माझी उमेदवारी मी मागे घेईन. तपासात काहीही चुकीचे आढळले नाही तर आम आदमी पार्टीचा प्रचार करण्यासाठी तुम्ही दिल्लीला याल अशी आशा व्यक्त करतो.