नवी दिल्ली - दिल्ली वीज नियामक मंडळाचे प्रमुख कृष्णा सैनी यांची नेमणूक रद्दबातल ठरवण्यात आली होती. त्या निर्णयावर फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे केली आहे.
केजरीवाल यांनी जंग यांचे मन वळवण्यासाठी २७ पानांचा पत्रप्रपंचही केला आहे. सैनी यांची नेमणूक रद्द ठरवल्यामुळे त्याचे दिल्लीच्या वीज क्षेत्राच्या दृष्टीने गंभीर परिणाम होऊ शकतात. किंबहुना दिल्लीतील ग्राहकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. सैनी यांच्या नेमणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या नियमांचा भंग केलेला नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांनी सैनी यांच्या नियुक्तीबाबत प्रत्यक्ष भेट घेण्याचीदेखील तयारी दर्शवली आहे.
जंग यांच्या कार्यालयाकडून याच सोमवारी नियुक्ती रद्द झाल्याचे कळवण्यात आले होते. केजरीवाल सरकारने मार्च महिन्यात जंग यांची परवानगी न घेता ही नेमणूक केली आहे, असे जंग यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. वास्तविक सरकारने नियंत्रकाच्या नेमणुकीसाठी याच वर्षी एका निवड समितीची स्थापना केली होती. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती समितीचे अध्यक्ष होते. दरम्यान, दिल्लीत सरकार स्थापनेपासून जंग विरूद्ध केजरीवाल हा वाद पाहायला मिळत आहे. राजकीय वादाला वैयक्तिक स्वरूप देण्याचाही प्रयत्न झाल्याने दिल्लीतील राजकारणात कायम वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत.