आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दुर्योधना’ला वाचवण्यासाठी आयोग बनला ‘धृतराष्ट्र’! केजरीवाल यांचे टीकास्त्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) कथित फेरफार होत असल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. ‘दुर्योधन भाजपला वाचवण्यासाठी निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे वागत आहे,’ अशा शब्दांत केजरीवाल यांनी आयोगावर टीकास्त्र सोडले. निवडणुका होत असलेल्या राज्यांत भाजपला सत्तेत आणणे हाच आयोगाचा हेतू आहे. त्यामुळेच सदोष ईव्हीएमची चौकशी करावी या आमच्या मागणीकडे आयोग दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.  

राजस्थानच्या धोलपूर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत काही ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली असावी, असे वृत्त रविवारी माध्यमांत आले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी सोमवारी आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आरोपांच्या फैरी झाडल्या. ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या तक्रारींकडे आयोग दुर्लक्ष करत असल्याच्या घटनेची तुलना त्यांनी महाभारतातील धृतराष्ट्राशी केली. 

केजरीवाल म्हणाले, ‘सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी धृतराष्ट्र ज्याप्रमाणे आपला मुलगा दुर्योधनाला मदत करत होता, त्याप्रमाणेच निवडणूक आयोग भाजपला सर्व प्रकारे (साम,दाम,दंड,भेद) मदत करत आहे. आयोग आणि भाजप हे दोघेही लोकशाहीचा खेळ करत आहेत. देशातील लोक हे सहन करणार नाहीत. ईव्हीएममध्ये फेरफार करता येत असताना निवडणूक घेणे थांबवा. अशा प्रकारे निवडणुका घेण्याचा फायदा काय? चौकशी करण्यास आयोग नकार देत आहे. त्यामुळेच गंभीर संशय निर्माण होत आहे.’  

धोलपूर पोटनिवडणुकीचा उल्लेख करून केजरीवाल म्हणाले की, प्रत्येक वेळी सदोष ईव्हीएममधील मते भाजपलाच कशी जातात? ही मते इतर राजकीय पक्षांना का मिळत नाहीत? याचाच अर्थ ईव्हीएमचे सॉफ्टवेअर बदलण्यात आले होते. २३ एप्रिलला होणाऱ्या महापालिका निवडणुकीतही राजस्थानमधील सदोष ईव्हीएमच आणल्या जाणार आहेत, असा दावाही त्यांनी केला.  

विरोधी पक्ष एकत्रितरीत्या आयोगाला भेटणार  
अलीकडेच झालेल्या निवडणुकांत ईव्हीएममध्ये कथित फेरफार केल्याच्या मुद्द्यावर आयोगाची एकत्रितरीत्या भेट घेण्याचा निर्णय विविध विरोधी पक्षांनी सोमवारी घेतला. गुजरात तसेच हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या आगामी निवडणुकांत व्हीव्हीपॅट (मतदानाचा पुरावा) आणि मतपत्रिका यांचा प्रत्येकी ५० टक्के वापर करावा, अशी मागणी हे पक्ष आयोगाकडे करणार आहेत. 

विविध विरोधी पक्षांची सोमवारी संसद भवनात बैठक झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. आमच्या मनातील सर्व शंका आयोगाने दूर कराव्यात आणि देशातील जनता आणि मतदार यांना या गंभीर मुद्द्यावर आश्वस्त करावे, अशीही विरोधकांची मागणी आहे. गुलाम नबी आझाद यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे नेते अहमद पटेल, आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि विवेक तनखा, संयुक्त जनता दलाचे नेते अली अन्वर अन्सारी, तृणमूलचे नेते सुखेंदू शेखर रॉय, बसपाचे सतीश मिश्रा, सपाचे नीरज शेखर, राष्ट्रवादीचे माजिद मेमन, भाकपचे डी. राजा, माकपचे सी. पी. नारायणन आणि राजदचे जे. पी. नारायण यादव तसेच इतर नेते उपस्थित होते. 
 
मतपत्रिकांचाच वापर करावा...
ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो. त्यामुळे पुन्हा मतपत्रिकांचाच वापर करावा. जुने ते नेहमीच सोने असते. लोकशाहीत निवडणूक आयोग प्रमुख राजकीय पक्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष करू शकत नाही.  
- ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा  
बातम्या आणखी आहेत...