आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejriwal Meets Lieutenant Governor To Demand The Dismissal Of Assembly

उपराज्यपालांच्या कार्यालयाचे मोदीकरण -आप नेता सोमनाथ भारती यांचा सडकून प्रहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये सरकार बनवण्यावरून चालू असलेला वाद चांगलाच चिघळताना दिसत आहे. आज अरविंद केजरीवाल व आपच्या नेत्यांनी उपराज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली. या भेटीनंतर आपचे नेता सोमनाथ भारती यांनी "उपराज्यपालांच्या कार्यालयाचे मोदीकरण झाले आहे" अशी सडकून टिका केली. तर सौरभ भारद्वाज यांनी "उपराज्यपाल भाजपच्या प्रवक्त्यांप्रमाणे बोलत आहेत" अशी टिका केली आहे.
या भेटीनंतर अरविंद केजरीवाल म्हणाले की, "दिल्लीत सरकार स्थापनेसाठी कोणता फॉर्म्यूला वापरणार असा प्रश्न उपराज्यपाल यांना केल्यावर त्यांच्याजवळ त्याचे उत्तर नव्हते."
उपराज्यपालांसोबतच्या या भेटीत आपण कोणालाही समर्थन देणार नसल्याचे जंग यांना सांगितले. तसेच काँग्रेस आमदारांनीही कोणालाही समर्थन देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत भाजपला 29 आमदारांच्या बळावर सत्ता स्थापने शक्य नाही, त्यामुळे विधानसभा बरखास्त करण्याची मागणी केजरीवाल यांनी केली. जंग यांनीही हे मान्य केले असून भाजपशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले अशी माहिती आपच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, जंग यांची भेट घेल्यानंतर राजघाटावर जाऊन अरविंद केजरीवाल यांनी महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. दिल्ली विधानसभेमध्ये निर्माण झालेल्या विविध शक्यतांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आप नेत्यांसह नवी दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांच्या भेटीला पोहोचले होते. त्यांनी नवी दिल्ली विधानसभा बरखास्त करून निवडणुका घोषित करण्याची मागणी केली.
दिल्लीच्या नागरिकांना सर्व सुवधा मिळाव्यात, त्यांच्या अनेक महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा निघावा यासाठी दिल्लीमध्ये सत्ता स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर विधानसभा बरखास्त करून निवडणुकांची घोषणा करणे गरजेचे असल्याचे मत केजरीवाल नजीब जंग यांच्याकडे मांडल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दिल्लीत सत्ता स्थापनेबाबत उठलेल्या अफवा आणि शक्यतांवरून गेल्या दोन काही दिवसांत अनेक तर्क लावले जात आहेत. केजरीवाल यांनी तर सत्तास्थापनेच्या मुद्यावरून भाजपवर घोडेबाजार सुरू असल्याचे आरोपही लावले होते. या प्रकरणानंतर भाजपने केजरीवालांवर एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही केली. एवढेच नव्हे तर केजरीवाल यांनी उपराज्यपाल नजीब जंग यांच्यावरही अनेक आरोप लावले आहेत.

भाजप म्हणजे सर्व पर्याय खुले
दरम्यान, भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी भाजपला सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकांची घोषणा केल्यास भाजप निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार असून पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार असल्याचे ते म्हणाले. त्याच प्रमाणे जर सत्ता स्थापनेसाठी विचारणा करण्यात आली तर आमच्याकडे असणारे आमदार आणि त्याआधारे निर्माण होणा-या शक्यता याचा विचार करूनच सत्तास्थापनेसाठी दावा करायचा की नाही, याबाबत निर्णय घेणार असल्याचे उपाध्याय म्हणाले. उपाध्याय यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर दिल्लीच्या स्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.