नवी दिल्ली - जे युवक राजकारण आणि नेत्यांना संशयाच्या दृष्टिकोनातून पाहत होते, देशातील अशा युवकांच्या मनात राजकीय आचरण आणि कामकाजाविषयी अरविंद केजरीवाल यांनी विश्वास निर्माण केला असल्याचे काँग्रेस महासचिव दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, केजरीवाल यांना परिपक्व लोकशाही देशाचे नागरिक असल्याचा फायदा झाला आहे.
दैनिक ‘दिव्य मराठी’ सोबत विशेष चर्चा करताना त्यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला सत्ता स्थापनेबद्दल शुभेच्छाही दिल्या. या वेळी दिग्विजय म्हणाले की, आम आदमी पार्टीला जनमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी संसदीय संस्था, न्यायपालिका आणि कार्यपालिकेचा सन्मान करायला हवा. सध्या संसदीय लोकशाहीत नेहरूवादी परंपरेला भ्रष्ट करण्यासाठी मोठे कट रचले जात असून ज्यांना पंडित नेहरू यांची समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारधारा पटत नाही ते लोक याचे नेतृत्व करत असल्याचेही ते म्हणाले. ज्या विचारधारेमुळे महात्मा गांधी यांची हत्या झाली होती आणि सध्या धर्माचा वापर करून सत्ता मिळवू पाहणारी विचारधारा हे लोक बाळगून असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
लोकशाही मजबुतीचे श्रेय नेहरूंना
आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील यशाबद्दल सिंह म्हणाले की, केजरीवाल आणि त्यांच्या सहका-यांनी जनआंदोलनाच्या माध्यमातून सत्तापरिवर्तनाचे जे प्रयत्न केले आहे ते लोकशाहीतील नेहरूवादी तत्त्वांवरच आधारित आहेत. पंडित नेहरू यांनी संसदीय लोकशाहीच्या मजबूत पायावर भारताच्या लोकशाहीची स्थापना केली होती. संसदीय लोकशाही राजकीय कामकाजाचा सर्वात कठीण मार्ग असल्याचे नेहरूजींना माहीत होते. त्यामुळे त्यांनी योग्यता, कामाप्रति निष्ठा, सहकार्य, स्व-शिष्टाचार आणि धैर्य यासारखे गुण आवश्यक असल्याचे म्हटले होते, असेही दिग्विजय म्हणाले.
लोकशाहीचे बीज आधीपासूनच रुजले
असल्यामुळे आपल्या देशात अन्य कोणतीही व्यवस्था यशस्वी होऊ शकत नाही. केजरीवालच्या आंदोलनाचा पायासुद्धा नेहरूजींच्या याच राजकीय विचाराचा आधार आहे. केजरीवाल संसदीय लोकशाहीच्या प्रातिनिधिक लोकशाहीला थेट लोकशाहीत बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयोग सध्या काही पाश्चिमात्त्य देशात सुरू आहे.