आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरींची ‘जंग’ चर्चेच्या वाटेवर, नायब राज्यपालांची घेतली भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील राजकीय तणाव निवळण्याची चिन्हे दिसू लागली असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन चर्चा केली. समन्वय वाढवण्यासाठीच उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

केजरीवाल यांच्यासमवेत या वेळी उपमुख्यमंत्री मनीष शिसोदियादेखील होते. त्यांनी सरकारच्या वतीने कायदामंत्री म्हणून नियुक्तीसंंबंधीही नायब राज्यपालांना माहिती दिली. जितेंद्रसिंह तोमर यांच्या जागी नवीन व्यक्तीच्या नेमणुकीची चर्चा दिवसभर राजधानीत होती. त्यात कपिल मिश्रा यांचे नाव आघाडीवर होते. बनावट पदवी प्रकरणी तोमर यांना मंगळवारी रात्री पोलिसांनी अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर नवीन नियुक्तीचा प्रश्न समोर होता. त्याचबरोबर उभयतांमधील ताणलेले संबंध सौहार्दपूर्ण करण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची मानली जात होती. त्याशिवाय दिल्लीतील अनेक नागरी समस्यांवरदेखील उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेतील (एसीबी) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात तणाव निर्माण झाला होता.

मिश्रा दिल्लीचे नवे कायदामंत्री
दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष कपिल मिश्रा आता केजरीवाल मंत्रिमंडळातील नवे कायदामंत्री असतील. बनावट पदवी प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेले जितेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याअगोदर चांदनी चौकच्या आमदार अलका लांबा, माजी कायदामंत्री सोमनाथ भारती ( मालवीयनगर), कैलाश गेहलोत यांच्या नावांचीही चर्चा होती. ३४ वर्षीय मिश्रा पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
केजरीवालांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची राजधानीत निदर्शने
तोमर प्रकरणात दिल्ली काँग्रेसने बुधवारी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यासाठी बुधवारी राजधानीत निदर्शने करण्यात आली. अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शनांत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आम आदमी पार्टीतील अनेक नेते तोमर यांची पदवी बनावट असल्याचे सांगत होते. परंतु त्याकडे केजरीवाल यांनी दुर्लक्ष केले. म्हणूनच आता राजीनामा द्यायची वेळ खरे तर केजरीवाल यांची आहे. आपने जनतेला लोकपालचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आपमध्ये अनेक ‘तोमर’ आहेत. केजरीवाल यांनी आपल्या भ्रष्ट आमदारांचा बचाव करू नये.