आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अपोलो’च्या तीन डॉक्टरांची चौकशी होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राजधानीतील किडनी रॅकेट प्रकरणात अपोलो रुग्णालयातील तीन किडनी रोग तज्ज्ञांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. किडनी रॅकेट प्रकरणात उपलब्ध करून दिलेल्या किडनीचे प्रत्यारोपण याच डॉक्टरांच्या देखरेखीखाली झाले होते. या रॅकेट प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक झाली आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रॅकेटचा सूत्रधार राजकुमार राव याच्या चौकशीदरम्यान या तीन डॉक्टरांची नावे समोर आली. या तीन डॉक्टरांपैकी एक जण सध्या अमेरिकेत आहे. तो गुरुवारी परत येणार होता, पण परतला नाही. त्याच्या दोन वैयक्तिक सहायकांना अटक झाली आहे. डॉक्टरवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचे एक पथक इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात करण्यात आले आहे. या डॉक्टरने काही कोऱ्या कागदांवर स्वाक्षऱ्या केल्याचे पोलिसांना तपासादरम्यान आढळले. रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हे कागद त्याचे सहायक वापरत असत. आणखी एका वरिष्ठ डॉक्टरच्या वैयक्तिक सहायकालाही पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. आता त्याची काय भूमिका होती हे तपासले जात आहे. या रॅकेटशी संबंधित किडनीदात्याच्या चौकशीत तिसऱ्या डॉक्टरचे नाव समोर आले. रावच्या चौकशीतही हेच नाव समोर आल्याने त्याच्या सहभागाबाबतचा संशय वाढला असून, पोलिस त्याच्या सहायकाच्या भूमिकेचीही तपासणी करत आहेत. या तिघांनाही चौकशीत सहभागी होण्यासाठी एक-दोन दिवसांत पोलिस नोटीस पाठवू शकते. रुग्णालयाच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अशाच नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...