आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kiran Bedi Poll Campaign In Charge Narendra Tandon Resigns From Bjp

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहांना भेटल्यानंतर बेदींना हुकुमशाह म्हणणा-या भाजप नेत्याचा राजीनामा मागे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केवळ 5-6 दिवस बाकी राहिले असतानाही भाजपमधील अंतर्गत कलह थांबण्याचे नाव घेत नाही. किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केल्याने नाराज असलेल्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या नरेंद्र टंडन यांनी बेदी यांच्या प्रचारप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
टंडन यांच्याकडे किरण बेदींचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केल्यानंतर त्यांचे वैयक्तिक प्रचारप्रमुख म्हणून अमित शहा यांनी नियुक्ती केली होती. मात्र, टंडन यांनी बेदी यांच्या वागणुकीवर जोरदार आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे. किरण बेदी या हुकुमशाही प्रवृत्तीच्या असून, त्या कार्यकर्त्यांना कच-यासमान मानत असल्याचे टंडन यांनी म्हटले आहे. तसेच आपण बेदी यांचे प्रचारप्रमुख म्हणून काम पाहू शकत नाही असे सांगत पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला आहे.
टंडन यांनी भाजपमधील सर्व पदाचे राजीनामे दिले आहेत. नरेंद्र टंडन यांच्यावर पक्षाचा प्रचार व प्रचाराच्या मुद्यांची तयारी करणे ही जबाबदारी होती. बेदी यांचा प्रचारप्रमुख म्हणून काम करतानाच दिल्ली विधानसभेसाठी पक्षाची रणनिती काय असावी याची जी समिती होती त्याचे सदस्य म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती.
किरण बेदींवर हल्लाबोल- भाजपमध्ये येताच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून किरण बेदींची पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी निवड करताच त्यांच्यात हुकुमशाहींचा दर्प चढला असल्याचा आरोप करीत टंडन यांनी अमित शहा यांना पत्र लिहले आहे. त्यात म्हटले आहे की, मी गेली 30 वर्षे भाजपचा सदस्य असून गेली दहा वर्षे पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करीत आलो आहे. मात्र, किरण बेदींसोबत काम करणे मला कठीन जात आहे. त्यांचा व्यवहार व वागणे-बोलणे ठीक नाही. बेदींचे सहकारी प्रत्येक बाबतीत माझा अपमान करीत आहेत. गेल्या दहा दिवसापासून बेदी ज्याप्रमाणे नेत्यांना, पदाधिका-यांना डिक्टेट करीत आहे त्या वातावरणात मला काम करणे अवघड जात आहे. मी केलेले आरोप कोणतेही सनसनाटी करण्यासाठी केले नसून पक्षाला तसे वाटल्यास त्यांनी मी केलेल्या आरोपांची चौकशी करावी असेही टंडन यांनी म्हटले आहे. याआधी दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनीही किरण बेदी यांच्या व्यवहाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर चार तासाच्या आत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी टंडन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नरेंद्र टंडन यांनी राजीनामा मागे घेतला आहे.