आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधवांचे शिक्षा प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात; 15 मे रोजी सुनावणी; भारताची बाजू साळवे मांडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेग / नवी दिल्ली / इस्लामाबाद- नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा स्थगित करण्यासाठी भारताने हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालय १५ मे रोजी याप्रकरणी सुनावणी करेल. न्यायालयाने भारताच्या याचिकेवर विचार करण्यास मंजुरी दिली आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत पाकिस्तानने ही कारवाई स्थगित करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याविषयीची माहिती जाधव यांच्या कुटुंबीयांना दिली आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये बुधवारी फाशीवर रोक लावल्याबद्दल मिठाई वाटप करण्यात आली. 

नवी दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गोपाळ बागले यांनी सांगितले की, भारताकडून याप्रकरणी वरिष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडतील. न्यायालय १५ मे रोजी सुनावणी करेल. तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानची बाजू एेकली जाईल. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी याविषयी सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली.  

जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानेच फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सांगितले की, भारतीय नागरिक जाधव यांचे इराणमधून अपहरण झाले. त्यांना बचावासाठी संधी दिली गेली नाही. भारताने १६ वेळा प्रयत्न करूनही त्यांच्याशी संपर्क साधू दिला नाही. पाकने त्यांना अवैधरीत्या बंदी ठेवले आहे. त्यांच्या जिवाला धोका असून व्हिएन्ना कराराचे हे उल्लंघन आहे. 

हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याचा निर्णय पाकच्या लष्करी न्यायालयाने दिला आहे. त्यांचा जीव वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि दक्षतेने घेण्यात आला आहे.  
- गोपाळ बागले, प्रवक्ता, भारतीय परराष्ट्र मंत्रालय  

भारताने पाकिस्तानमध्ये त्यांच्याद्वारे प्रायोजित दहशतवादावरून लक्ष विचलित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली. कुलभूषण यांनी देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावल्याने त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारताने भरकटलेल्या रणनीतीचा वापर केला आहे.  
- ख्वाजा एम. अासिफ, संरक्षणमंत्री, पाकिस्तान  

आम्ही याप्रकरणी तपास करून इराणच्या चाबहारमध्ये कुलभूषण यांच्या व्यवसायासंबंधीही माहिती घेत आहोत. पाकिस्तानकडूनदेखील माहिती मागवली आहे.  
- गुलामरजा अन्सारी, भारतातील इराणचे राजदूत 
बातम्या आणखी आहेत...