आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एनडीएला पहिला झटका, बिष्णोईंचे भाजपशी काडीमोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) पहिली फूट पडली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी हरियाणातील हरियाणा जनहित काँग्रेसने (हजकाँ) भाजप सोबतचे तीन वर्षे जुने संबंध तोडले आहेत. हजकाँचे नेते कुलदीप बिष्णोई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे. त्यांनी भाजपला 'विश्वासघाती पक्ष' म्हटले आहे.

कुलदीप बिष्णोई म्हणाले, 'भाजपचा इतिहास तपासला तर हा एक विश्वासघात करणारा पक्ष आहे. अशा विश्वासघाती पक्षाला सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढू शकत नाही.' भाजपने बिष्णोई यांच्यावर पलटवार केला आहे. पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन म्हणाले, 'हरियाणाच्या जनतेला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे. तेथील जनता काँग्रेसवर नाराज आहे. त्यामुळे जे त्यांच्या आसपास देखील आहेत, जनता त्यांना देखील स्विकारणार नाही.'

शिवसेना नेत्यांचा सावध राहाण्याचा सल्ला
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एनडीएला हा पहिला झटका आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएतून बाहेर पडणारा हरियाणा जनहित काँग्रेस हा पहिला पक्ष आहे. यामुळे आघाडीत खळबळ सूरु झाली आहे. भाजपचा महाराष्ट्रातील नैसर्गिक मित्र शिवसेना देखील युती तोडण्याची भाषा बोलत आहे. हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. शिवसेनेच्या काही नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजप सोबतच्या युतीचा फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे. या नेत्यांचे म्हणणे आहे, की शिवसेनेने भाजपपासून सावध राहिले पाहिजे. त्यांनी हरियाणात हजकाँसोबत जे केले ते महाराष्ट्रात शिवसेनेसोबतही तसे करु शकतात.

हरियाणा जनहित काँग्रेसचे नेते कुलदीप बिष्णोई यांनी गुरुवारी चंदीगड येथे पत्रकार परिषदेत भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या. बिष्णोई म्हणाले, 'भाजपचे आम्ही सहकारी पक्ष असताना लोकसभा निवडणुकीत त्यांनी आमच्या दोन जागा पाडण्यात हातभार लावला.' त्यांचा दुसरा आरोप आहे, की राज्यात हजकाँला कायम दुय्यम स्थान आणि अपमानजनक वागणूक मिळत आहे. हे आता सहनशिलतेच्या पलिकडे झाले होते. भाजपला युतीचा धर्म पाळता येत नाही. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहांसोबत जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी बिष्णोई दिल्लीला आले होते. मात्र, शहांनी त्यांच्याशी चर्चा केली नाही. तेव्हापासूनच युती संपूष्टात येणार अशी चर्चा सूरु झाली होती.

यामुळे तुटली युती
लोकसभा निवडणुकीपासूनच भाजप आणि हरियाणा जनहित काँग्रेस यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. हजकाँने दोन जागा लढल्या होत्या आणि दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता. तर, भाजपने सात जागांवर विजय मिळविला होता. विधानसभेच्या जागा वाटपावरुनही दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. बिश्नोईंच्या हजकाँला 90 पैकी 45 जागा हव्या होत्या. त्यासोबतच त्यांना युतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याची त्यांची मागणी होती. या दोन्ही मागण्या भाजपने साफ फेटाळल्या होत्या.
संग्रहित छायाचित्र - तीन वर्षांपुर्वी भाजपसोबत आघाडी केल्यानंतर हरियाणा जनहित काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज व नितीन गडकरी.