आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणापलीकडील अनोखे व्यक्तिमत्त्व : लालकृष्ण अडवाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून भारतीय राजकारणात लालकृष्ण अडवाणींचे नाव जास्त चर्चेत आहे. नरेंद्र मोदी प्रकरणात या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सर्वांनाच राजकीय धक्का दिला होता.राजकारण आणि अडवाणी यांचे एक अतूट नाते असले तरी राजकारणापलीकडील त्यांचे एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. चित्रपट,पुस्तके, खेळ हेदेखील त्यांच्या आवडीचे विषय आहेत.

नरेंद्र मोदी यांना भाजपने निवडणूक प्रचार प्रमुख केल्यानंतर नाराज झालेले अडवाणी. त्यानंतर त्यांनी दिलेला राजीनामा आणि परत आपल्या खास लोकांच्या आग्रहास्तव परत घेतलेला राजीनामा. हा सर्व घटनाक्रम एक नाटक किंवा चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे होता अशी टीका काही माध्यमपंडितांनी केली. लालकृष्ण अडवाणी ज्या प्रकारे धक्कातंत्र आणि नाट्यमय राजकारणाचा अविभाज्य अंग राहिले आहेत. त्याप्रमाणे चित्रपट, नाटक, पुस्तके आणि संगीत अडवाणींच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहेत. बालपणापासूनच त्यांना चित्रपटांची आवड आहे. त्यांनी कराचीत मामा सुंदरसोबत अनेक भयपट पाहिले होते. यातील फ्रँकेस्टाइन हा चित्रपट त्यांना आजही आठवतो. गुरुदत्त आणि राजकपूर हे त्यांचे आवडते कलाकार होते. राजकपूर यांचे सुरुवातीचे सर्वच चित्रपट त्यांच्या आवडीचे आहेत. एक चांगला कलाकार आणि व्यक्ती म्हणून सुनील दत्त यांची कायम आठवण काढतात. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांच्यासोबत अडवाणींचे सलोख्याचे संबंध होते. ही मैत्री एवढी दृढ होती की 1969 मध्ये अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट सात हिंदुस्तानी चित्रपटाचे अडवाणी आणि त्यांच्या कुटुंबासाठी स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले होते. राजकारणाच्या व्यापामुळे आपल्याला जास्त चित्रपट पाहता येत नाही, अशी खंत त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. असे असले तरी त्यांनी पाहिलेल्या चित्रपटांची यादी सामान्य दर्शकाच्या तुलनेत कितीतरी मोठी आहे. अलीकडच्या काळात त्यांनी तारे जमीन पर, गांधी : माय फादर, चक दे इंडिया आणि लगे रहो मुन्नाभाई सारखे चित्रपट पाहिले आहेत. तर हॉलीवूडच्या ‘द ब्रिज ऑन द रिव्हर कवाय’, ‘माय फेअर लेडी’ आणि ‘द संडे ऑफ म्युझिक’ या चित्रपटांचा समावेश होतो.

आयपॅडमध्ये शेकडो गाणी

कराचीत आरएसएस बँड पथकात फ्लूट वाजवण्याची जबाबदारी अडवाणी यांच्याकडे होती. बालपणानंतरही त्यांचे संगीतप्रेम कायम राहिले. आजही त्यांच्या आयपॅडमध्ये 300 पेक्षा जास्त गाणी स्टोअर असतात.लता मंगेशकर त्यांच्या ऑल टाइम फेव्हरिट गायिका आहेत. त्याचप्रमाणे अनुप जलोटांचे भजन आणि जगजित सिंह,मेहंदी हसन,मल्लिका पुखराज यांच्या गझल त्यांना आवडतात.

असंख्य पुस्तकांचा संग्रह

एखाद्या निवडणूक प्रचार सभेला जायचे असो की एखादा दौरा. प्रवासादरम्यान पुस्तक वाचणे हे आलेच. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी फ्रेंच विज्ञानकथाकार जूल्स वर्नच्या सर्व कादंबर्‍या वाचून काढल्या होत्या. जीवनातील सुरुवातीच्या दिवसात त्यांच्यावर डेल कार्नेगीच्या ‘हाऊ टू विन फ्रेंडस अँड इन्फ्लुएंस पीपल’पुस्तकाचा जास्त प्रभाव झाला. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी हे पुस्तक वाचले होते.

क्रिकेटप्रेमी अडवाणी

शालेय दिवसात क्रिकेट खेळणे अडवाणींना फार आवडत होते. आजही त्यांच्याकडे एक फोटो आहे, ज्यात ते आपल्या शाळेच्या विजेत्या टीममध्ये आहेत. विजेत्या संघासोबत जल्लोष करताना अडवाणींच्या हातात ट्रॉफी आहे. ते स्वत:ला फार मोठा खेळाडू मानत नाहीत. ते क्रिकेट समालोचन अति उत्सुकतेने ऐकतात. वाढत्या वयानुसार क्रिकेट खेळणे बंद झाले, परंतु आतादेखील ते वेळ मिळेल तेव्हा टीव्हीवर सामना पाहण्याचा आनंद घेतात.

टेनिस सोडून शाखेवर हजेरी

अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील होण्याची गोष्ट देखील रंजक अशी आहे. पाकिस्तानातील हैदराबाद शहरात अडवाणी यांचे कुटुंब राहत होते. 14 वर्षांचे असताना उन्हाळ्याच्या सुटीत टेनिस खेळणे सुरू केले. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र मुरली मुखीदेखील टेनिस खेळत.एक दिवस खेळता खेळता मुरली डाव अध्र्यावर सोडून जाऊ लागला. त्या वेळी अडवाणींनी त्याला विचारले, कुठे चालला आहेस ? त्यावर मुरलीने सांगितले की तो आरएसएसचा स्वयंसेवक झाला असून शाखेवर चाललाय. त्यानंतर दोन दिवसांनी अडवाणीदेखील आरएसएसच्या शाखेत सहभागी झाले.