आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललितगेट : भारताकडून इंटरपोलला कधी रेड कॉर्नर मिळालीच नव्हती!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएलचे माजी आयुक्त आणि सध्या राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनलेल्या विषयातील मुख्य पात्र ललित मोदी यांच्याविरुद्ध भारताकडून रेड कॉर्नर नोटीसच मिळाली नव्हती, असा दावा इंटरपोलचे माजी सरचिटणीस रोनॉल्ड के. नोबेल यांनी केला आहे. २०१० मध्ये मोदींविरुद्ध ही नोटीस बजावण्यात आली होती, असा दावा केंद्र सरकार करत आहे. या खुलाशामुळे ललित मोदी प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली.

ललित मोदी यांना ब्रिटनमधून पोर्तुगालला जाण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सध्या वादात सापडल्या आहेत. यावर स्वराज यांचा बचाव करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असा दावा केला होता की, २०१० मध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या सांगण्यावरून मोदींविरुद्ध महसूल गुप्तचर विभागाने रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. ही नोटीस आजही वैध ठरत असल्याचे जेटली यांचे म्हणणे आहे. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांच्यानुसार २०१० मध्ये यूपीए सरकारने मोदी प्रकरणी कधीही इंटरपोलशी संपर्क साधलेला नाही.

ललित मोदींसोबतचे आपले छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर नोबेल यांनी एका वृत्तवाहिनीला ई-मेल पाठवून हा खुलासा केला. २०१३ पासून आपण ललित मोदी यांना ओळखत असलो तरी भारतात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती आपल्याला नव्हती, असे नोबेल यांचे म्हणणे आहे. शिवाय मोदींविरुद्ध सुरू असलेल्या या कारवाईबाबत भारतानेही कधी इंटरपोलकडे मदत मागितली नाही िशवाय यावर कोणतीही नोटीस पाठवली नाही, असे नोबेल यांनी म्हटले आहे.

भाई-भाई...
एका वृत्तवाहिनीने नोबेल व ललित मोदी यांचे एक एकत्रित छायाचित्र प्रसिद्ध केले. बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील फुटबॉल सामन्यादरम्यान दोघेही व्हीआयपी बॉक्समध्ये सोबत होते. २४ ऑक्टोबर २०१४ मध्ये मोदींनीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे छायाचित्र पोस्ट केले होते. यासोबत त्यांनी "माझ्या बंधुसमान असलेले रोनॉर्ल्ड नोबेल यांच्यासोबत...' असे पोस्ट केले होते. नेमक्या याच काळात नोबेल इंटरपोलसारख्या महत्त्वाच्या संस्थेचे सरचिटणीस होते. गेल्या ७ नोव्हेंबरला ते निवृत्त झाले. २००० ते २०१४ दरम्यान ते इंटरपोलचे सरचिटणीस होते.

भाजप खासदार सिंह यांचा घरचा आहेर...
माजी गृहसचिव व भाजप खासदार आर. के. सिंह यांनी ललित मोदी यांना मदत केल्याच्या प्रकरणात सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे व मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्यावर टीका केली. एखाद्या फरार माणसाला कुणी मदत करत असेल तर ते चुकीचेच आहे, असे सिंह यांनी म्हटले आहे. कायदेशीर तसेच नैतिकदृष्ट्या याचे समर्थन करता येणार नाही. ललित मोदींना भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होण्याची गरज असल्याचेही सिंह यांनी म्हटले आहे.

दिल्ली विधानसभेत गोंधळ
केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत बोलण्यास प्रारंभ करताच भाजप आमदार ओमप्रकाश शर्मा यांनी त्यांना बोलताना मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला. शेवटी सभापतींनी मार्शलना बोलावून शर्मा यांनी बाहेर काढले. नरेंद्र मोदींचा उल्लेख केजरींनी करताच शर्मा यांनी केजरींना थांबवण्याचा प्रयत्न केला होता.

पंतप्रधानांना अंधारात ठेवले : केजरीवाल
बनावट पदवी प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले िदल्लीचे माजी मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांनी मला अंधारात ठेवले. मात्र, जेव्हा त्यांचे कारनामे लक्षात आले तेव्हा आम्ही तत्काळ कारवाई केली. ललित मोदी प्रकरणातही काही मंत्री पंतप्रधानांना अंधारात ठेवत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केली. तोमर प्रकरणी प्रथमच केजरींनी ही बाजू मांडली. सोबत सुषमा स्वराज व राज े यांच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली.