आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalkrishna Advani Predicts Early Elections With BJP Winning With Record Margins

भाजप विजयाचा विक्रम मोडेल; लालकृष्‍ण अडवाणींचे भाकीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीचे भाकीत करून या निवडणुकीत भाजप विजयाचे आजवरचे विक्रम मोडीत काढेल, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी केला. पक्षाच्या प्रचार समिती प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यापासून अडवाणी शांत होते. सद्य:स्थितीत देशातील जनता भाजपच्याच पाठीशी असल्याचेही ते म्हणाले. (राजकारणापलीकडील अनोखे व्यक्तिमत्त्व : लालकृष्ण अडवाणी)

यापूर्वी 10 मार्चला अडवाणी यांनी मध्य प्रदेशात उमरियामध्ये भाषण केले होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यशस्वी मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते. नंतरच्या काळात ते अनेक बैठकांना उपस्थित राहिले, परंतु जाहीर भाष्य केले नाही. त्यानंतर शनिवारी प्रथमच त्यांनी पक्षाच्या वतीने विजयाचे भाकीत केले. दिल्लीत पक्षाच्या अनुसूचित जाती आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ते बोलत होते. भ्रष्टाचारामुळे जनता वैतागली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका तसेच लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

संघ, कांशीरामांची स्तुती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांना सोबत घेऊन जाणारी संघटना आहे. तिचा जातीयवादावर विश्वास नाही, अशा शब्दांत त्यांनी संघाची स्तुती केली. यापूर्वी मोदींच्या निवडीनंतर अडवाणींची संघावरही नाराजी होती. भाषणात त्यांनी कांशीराम यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. सामाजिकदृष्ट्या जे मिळत नाही ते राजकारणाच्या माध्यमातून मिळवता येऊ शकते, असे ते म्हणाले.

अडवाणीचे भाकीत म्हणजे हवेत बंगला बांधण्यासारखे असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावतींनी केली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतरच सर्व स्पष्ट होणार आहे.

लोकसभेच्या निवडणुका मुदतपूर्व होतील. त्याचबरोबर उत्तरप्रदेशात भाजपच क्रमांक एकचा पक्ष बनेल, असे एका सर्व्हेक्षणाच्या अहवालात समोर आले आहे.

सर्वेनुसार यूपीमध्ये भाजपला 29 ते 33 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2009मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले होते.

पराभवाचा विक्रम मोडीत निघेल : काँग्रेस


भाजपच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या काँग्रेस नेत्यांनी अडवाणींनी मौन सोडल्यानंतर केलेल्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला. यावर तत्काळ प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते अखिलेश प्रसादसिंह यांनी आगामी निवडणुकीत भाजपला मोठ्या विजयाची खात्री वाटत असली तरी हा पक्ष आजवरच्या त्यांच्या विजयाचे नव्हे, पराभवाचे विक्रम मोडित काढेल, असा दावा केला.

एफबीआय चौकशी करा : शकील
अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारल्याप्रकरणी काँग्रेस सरचिटणीस शकील अहमद यांनी शनिवारी भाष्य केले. राष्ट्रपती ओबामांना लिहिलेल्या पत्रांवर कोणत्या खासदारांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत याची चौकशी अमेरिकेची नावाजलेली तपास संस्था एफबीआयच्या वतीने करायला हवी, अशी मल्लिनाथी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.