आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथातून उतरले लालकृष्ण; मोदींमुळे नाराज अडवाणींचा सर्व पदांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गोव्यातील घाव भाजपच्या भीष्म पितामहांना अखेर सहन झाला नाहीच. नाट्यमय घटनाक्रमात पक्षाच्या सर्व प्रमुख पदांचा राजीनामा देत 85 वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींविरुद्ध अखेरची चाल खेळली. मोदी यांच्याकडे प्रचार समिती प्रमुखपदाची धुरा जाऊन 24 तास उलटत नाहीत तोच महारथी रथावरून खाली उतरले. अडवाणी यांच्या निर्णयानंतर बैठकांचे सत्र सुरू झाले. मोदी यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी नव्हे, तर अडवाणी यांचे मन वळवण्यासाठी. संसदीय मंडळाची बैठक झाली. सर्वांनीच राजीनामा फेटाळून लावला.


तत्पूर्वी, संघाने भूमिका स्पष्ट केली की, राजी झाले तर ठीक, नाहीतर पक्षाने वाटचाल सुरू ठेवावी. पाठोपाठ विजय गोयल यांचे वक्तव्य आले की, मोदींबाबतचा निर्णय मागे घेतला जाणार नाही. मोदींनीही अडवाणी यांना फोन केला. आधी उचलला नाही. नंतर उचलला तेव्हा ‘भेट होईल तेव्हाच बोलेन’, असे सांगून कट केला. या घडामोडींमुळे मित्रपक्ष अधिक अडचणीत आले. अडवाणी यांनी कार्यकारिणी, संसदीय पक्ष व निवडणूक समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला. तथापि, रालोआच्या अध्यक्षपदी मात्र ते कायम आहेत. अडवाणी यांचे मन वळवावेच लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे. अडवाणी यांच्यामुळेच आम्ही सोबत होतो. आता रालोआत राहायचे की नाही याचा विचार करावा लागेल, असे जदयूने म्हटले आहे.


देशातील राजकारणाचा हा
टर्निंग पॉइंट

कारण...
1 अटल-अडवाणी युगाचा अस्त
अडवाणींनी राजीनामा परत घेतला तरी काही फरक पडणार नाही. भाजपमध्ये सुरुवातीपासून वाजपेयी होते तसे अडवाणीही होते. आता पक्षात एक नेता, बाकी कार्यकर्ते असतील. मोदींचा स्वभावच तसा आहे.
2 यूपीएला जाहीर आव्हान
अटलजींनंतर काँग्रेसला मोदींच्या रूपाने प्रथमच थेट आणि जाहीर आव्हान मिळाले आहे. आता अमेरिकी राष्‍ट्रपती निवडणुकीसारखी लढाई दोन नेत्यांमध्ये होईल. मोदी विरुद्ध राहुल.
3 घटक पक्षांची अग्निपरीक्षा
नवे उभरते चित्र पाहता भाजपपेक्षा त्याच्या सहकारी पक्षांची अग्निपरीक्षा आहे. अटल-अडवाणी यांच्याकडे पाहून जे मदतीसाठी आले होते त्यांनी आता कुठे-कसे जावे हे ठरवणे कठीण होईल.
4 डिसेंबरमध्ये चित्र पालटेल
पाच राज्यांतील निवडणूक निकाल डिसेंबरपर्यंत येतील. भाजप विजयी झाला तर मोदीविरोध संपेल. अनुकूल निकाल नसतील तर अडवाणींचा गट सक्रिय होईल. तोवर संशयाचे धुके राहील.


पूर्वीचा भाजप राहिला नाही
अडवाणी यांचे राजनाथसिंहांना पत्र
श्री. राजनाथसिंह,
जनसंघ व भाजपत काम केल्याचा मला आयुष्यभर अभिमान वाटत राहिला, परंतु गेल्या काही दिवसांत पक्ष ज्या पद्धतीने काम करत आहे आणि ज्या दिशेने जात आहे, त्याचा ताळमेळ बसवणे मला अवघड जात आहे. डॉ. मुखर्जी, दीनदयालजी, नानाजी व अटलजी यांनी बांधणी केली होती तसा हा पक्ष राहिला नाही. देशाची चिंता सोडून नेत्यांचा आपलाच अजेंडा लागू करण्याचा आटापिटा आहे. हे पत्रच माझा राजीनामा म्हणून स्वीकारावे.
एल. के. अडवाणी (10.6.2013)


अडवाणी यांचे प्रश्न...
० भाजप वैयक्तिक अजेंडा असलेल्या नेत्यांचा पक्ष झाला काय?
० भाजपमध्ये अंतर्गत लोकशाही संपुष्टात आली आहे काय?
० पार्टी विथ डिफरन्सऐवजी पक्ष व्यक्तिवादी झाला आहे काय?


तेच हे अडवाणी
रथयात्रेच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतरही ज्यांनी पंतप्रधान अटलजीच होतील असे म्हटले होते.
असे का केले?
अटलजींच्या काळात हट्टाने उपपंतप्रधान झाले, पण पंतप्रधानपदाची इच्छा अधुरी राहिली. मोदींच्या आधाराने ती पूर्ण करू इच्छित होते. परंतु मोदींच्या मनातही ती बळावली. मोदींची घोषणा रोखण्यासाठी नाराज झाले, आजारी पडले. मनधरणीसाठी कोणी आले नाही. दूताकरवी (सुषमा) संदेश पाठवला. तरीही उपयोग झाला नाही. संघाच्या आदेशाने राजनाथ दुप्पट शक्तीने अडवाणींच्या विरोधात होते. अस्वस्थ असाल, तर आराम करा. येऊ नका, असे ते म्हणाले. मोदींच्या नावाची घोषणा करून टाकली. सोमवारी तर राजनाथ यांनी हद्दच केली. अस्वस्थ शब्दांतील ‘अ’ काढून टाकला. अडवाणी आधीही स्वस्थ होते आणि आजही, असे मीडियाला म्हणाले. मग अडवाणी यांनी आधीच लिहून ठेवलेला राजीनामा पाठवून दिला.


पुढे काय होणार?
परिस्थिती हीच राहील. मोदींच्याच नेतृत्वाखाली निवडणूक होईल. लालूंमुळे नितीश भाजपसोबत राहतील. वाद मिटावा म्हणून भाजप राज्याची वेगळी प्रचार समिती नेमू शकतो.


निवडणुकीनंतरचा असाही मार्ग
निवडणुकीनंतर व्हीपी-देवीलाल या सूत्राची पुनरावृत्ती होऊ शकते. चंद्रशेखर यांनी देवीलाल यांचे तर देवीलाल यांनी व्ही. पी. सिंग यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले होते. राजनाथ या प्रकारे

पंतप्रधानपदासाठी हवे ते नाव सुचवू शकतात.
हा निर्णय केवळ मोदींमुळे नाही : मुंडे
केवळ मोदींच्या निवडीमुळे अडवाणींनी राजीनामा दिलेला नाही, असे सांगून भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यामागे इतरही कारणे असू शकतात, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले. वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढतील, असा विश्वास व्यक्त करून आपणही दिल्लीला जाणार असल्याचे मुंडे म्हणाले. सर्वांच्या सहमतीनेच मोदींकडे धुरा देण्यात आली. आले असते तर अडवाणीही प्रक्रियेत सहभागी झाले असते, असे ते म्हणाले. रालोआतील घटकपक्ष जदयू नाराज असल्याबाबत मुंडे म्हणाले की, रालोआ एकसंघ आहे.


राजकारणाचा खेळ असा
राजकारणात वक्तव्ये का केली जातात आणि त्यामागे काय चाल असते? भाजप, मोदी आणि अडवाणी प्रकरणाशी संबंधित वक्तव्ये, त्यातील गर्भितार्थ असा 5 बड्या चाली
अडवाणी म्हणाले मोदींपेक्षा शिवराज ग्रेट
गुजरात राज्य तर सुरुवातीपासून पुढारलेले होते. मोदींनी त्याला उत्कृष्ट घडवले. मात्र, मध्यप्रदेश आजारी, मागासलेले होते. त्याला शिवराज यांनी सुदृढ बनवले. चमत्कार येथे झाला आहे.
(1 जून रोजी ग्वाल्हेरमध्ये)


राजकीय चाल : शिवराजसिंह चौहान यांच्यात महत्त्वाकांक्षा जागवण्याची अडवाणींची इच्छा आहे. जेणेकरून त्यांनी स्वत:ला मोदींपेक्षा प्रबळ नेता मानावे.
शिवराजसिंह म्हणाले मी तर नंबर 3
मोदीजी मोठ्या भावासारखे आहेत. मोदीजी आणि रमणसिंहजी माझे वरिष्ठ आहेत. नंबर एक, नंबर दोन तर सोडा, मी तर नंबर 3 आहे. (3 जून, भोपाळ)


राजकारण : अडवाणींची स्तुती करून आपण सत्तेत उच्च पदावर पोहोचू शकत नाही हे शिवराज जाणतात. या लढाईत म.प्र.च्या सत्तेत काही तडजोड होऊ शकते.
राजनाथ म्हणाले- जो लोकप्रिय तोच नेता
मी प्रथम भाषण द्यायला आलो आहे म्हणून अगोदरच सांगतो, लोकशाहीत तोच नेता असतो जो लोकप्रिय असतो. अशा नेत्याचे भाषण लोकांना शेवटी हवे असते.
(9 जूनला गोव्यात वक्तव्य)


राजकारण : अडवाणींची सद्दी संपल्याचे स्पष्ट संकेत राजनाथ यांनी दिले. यातून हे सांगितले की, मोदीच आता नंबर वन नेते आहेत.
मोदी- बाहेर बसले त्यांना नाही कळणार
राजनाथजींनी जे केले ते बाहेर बसलेल्या लोकांना कळणार नाही. पदामुळे कोणी माणूस मोठा होत नसतो. त्यासाठी मन मोठे असणे आवश्यक आहे.
(9 जूनला गोव्यात वक्तव्य)


राजकारण : यातून मोदींनी अडवाणींना संदेश दिला की, आपण ज्येष्ठ आहात तर मनसुद्धा मोठे ठेवा. खजुरासारखे वाढून काय उपयोग?
दिग्गी म्हणाले- राजनाथांचे काम वंडरफुल
मोदी कोणत्याही पदावर गेले तरी संबंध नाही. अडवाणी जे काय करतील तो त्यांचा प्रश्न आहे. एक मात्र खरे की, राजनाथजींनी वंडरफुल काम केले.
(9 जूनला वक्तव्य)


राजकारण : दिग्विजय यांनी काँग्रेसला मोदींचे असलेले भय लपवण्याचा प्रयत्न केला. राजनाथ यांची स्तुती करून अडवाणी गटाला भडकावण्याचा हा प्रयत्न होता.