आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लालूप्रसाद यादवांच्या पक्षाचा जनता परिवार ऐक्यात अडसर, मुलायमसिंह यांची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जनता परिवाराच्या एकीकरण मोहिमेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव हेच सद्यस्थितीत अडसर ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्यात नुकतीच याबाबत चर्चा झाली. नितीश मुलायम यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले व अवघ्या सात मिनिटांत बाहेर पडलेदेखील. नितीश ज्या वेगाने मुलायम यांना भेटले, त्याच वेगाने ते माघारी फिरले. परंतु या छोट्या भेटीतून जनता परिवाराच्या ऐक्यातील नेमके कारण स्पष्ट झाले.

जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव हेही मुलायम यांच्या निवासस्थानी हजर होते. या परिस्थितीत नेमके पुढे काय करायचे अशी विचारणा मुलायम यांनी यादव यांच्याकडे केली. कोणत्याही परिस्थितीत जनता परिवार एकच राहिला पाहिजे. यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. नितीशकुमार यांनाही जनता परिवाराच्या ऐक्यात आता विनाकारण विलंब होत असून त्यामुळे सर्वच पक्षांना फटका बसू शकतो, असे मत व्यक्त केले.यावर मुलायम म्हणाले की, ऐक्यासाठी माझीही तयारी आहे. परंतु लालूप्रसाद ऐकायला तयार नाहीत. त्यावर नितीश तावातावात म्हणाले, ते ऐकत नसतील तर न ऐकू द्या. आम्ही आणखी वाट बघू शकत नाही, असे म्हणून ते बाहेर पडले. ऐक्याबाबत मतभेद असले तरी सर्व काही ठीक होईल,असा विश्वास शरद यादव यांनी व्यक्त केला.

लालूंवर आमदारांचा दबाव
राजदच्या काही आमदारांनी ऐक्यासंदर्भात पक्ष सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांच्यावर दबाव आणला आहे. जदयूसोबत आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची मागणी पक्षाच्या काही आमदारांनी केली आहे. एकटे लढून भाजपचा मुकाबला करता येणार नाही, असे आमदारांना वाटते. परंतु लालू त्यासाठी तयार नाहीत. जागावाटपावर ते अडले आहेत.