नवी दिल्ली - दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या शेवटच्या पुस्तकात 'अग्नी' क्षेपणास्त्राबाबत महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. १९८९ मध्ये 'अग्नी'च्या उड्डाणाच्या काही तासांपूर्वी मोहिमेचे प्रमुख अब्दुल कलाम यांना हॉटलाइनवरून एका सरकारी अधिकाऱ्याचा कॉल आला होता. क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणात विलंब लावण्यासाठी अमेरिका आणि नाटोकडून जोरदार दबाव आणला जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने त्या कॉलद्वारे कलाम यांना सूचित केले. ते सरकारी अधिकारी म्हणजे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे कॅबिनेट सचिव टी. एन. शेषण. या घटनेचा उल्लेख कलाम यांनी त्यांच्या शेवटच्या 'अॅडव्हांटेज इंडिया : फ्रॉम चॅलेंज टू अपॉर्च्युनिटी' या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक लवकरच बाजारात येईल.
कलाम यांनी लिहिल्यानुसार, प्रक्षेपणाच्या काही तासांपूर्वी पहाटे तीन वाजता हॉटलाइन कॉल आला. पलीकडून शेषण यांनी अग्नी क्षेपणास्त्राच्या प्रगतीबाबत विचारणा केली. मी उत्तर देण्यापूर्वीच त्यांनी वाट न पाहता पुढे संवाद सुरू ठेवला. अग्नीच्या परीक्षणात विलंब करण्यासाठी अमेरिका आणि नाटोकडून आम्ही प्रचंड दबावात आहोत. सध्या काही तज्ज्ञांचा यावर संवाद सुरू आहे. मात्र, कलाम अग्नीबाबत आमची प्रगती काय हे तुम्ही सांगा? असे त्यांनी विचारले. या प्रश्नाचे उत्तर देणे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते. कारण या मोहिमेसाठी माझ्या चमूने प्रचंड मेहनत घेतली होती.
तासाभराने आले ‘ओके’
सुमारे दशकभरापूर्वीपासून काही तरुण संशोधक यात जिवापाड मेहनत घेत होते. त्यामुळे अचानक त्याबाबत नकारात्मक सांगणे अशक्यप्राय होते. मी त्याचक्षणी स्वत:ला सावरले आणि आता क्षेपणास्त्र कोणत्याही स्थितीत माघार घेऊ शकणार नाही, असे शेषण यांना ठणकावून सांगितले. त्यानंतर शेषण या उत्तरावर माझ्याशी वाद घालतील, अशी मला अपेक्षा होती. मात्र, त्यांनी फोन ठेवला आणि सुमारे तासाभराने ४ वाजता 'ओके' असे उत्तर दिले. त्यामुळे ती चाचणी निर्विघ्न पार पडू शकली, असे कलाम यांनी यात लिहिले आहे.