आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Late Former Union Minister Gopinath Munde Death Is Accident CBI

दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू अपघातीच; घातपात नाही - सीबीआय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजप नेते व दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघातीच असून, त्यामागे घातपात नसल्याचा अहवाल सीबीआयने केंद्रीय गृह मंत्रालयाला दिला आहे. ३ जून रोजी मुंडे यांच्या कारला दिल्लीत अपघात झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मुंडे यांचे दिल्लीतील पृथ्वीराज आणि तुघलक रोडवरील चौकात अपघाती निधन झाले यामागे घातपात असल्याची शंका मुंडे यांच्यावर प्रेम करणा-या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मुंडे यांच्या मृत्यूला भाजपमधील गटातटाचे राजकारण असल्याबाबतच्या चर्चेला ऊत आला होता. या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मराठवाड्यातील लोक करत होते. मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे यांनीही सीबीआय चौकशीचा सूर आळवला होता. मुंडे यांच्यामागे असलेली बहुजन समाजाची मते पाहता विधानसभा निवडणुकीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशी शक्यता बळावल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि विनोद तावडे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी तातडीने करावी अशी मागणी केली होती. सीबीआयने याप्रकरणी अहवाल तयार करून मंगळवारी गृह मंत्रालयाकडे दिला. यामुळे सर्वच तर्क वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

गडकरींवर हल्ला, पाठोपाठ हालचाली
पुण्यात मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोमवारी बूटफेकीचा प्रयत्न करणारा तरुण वंजारी समाजाचा होता. मुंडे यांच्या निधनाची सीबीआय चौकशी होत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. ऐन निवडणुकांमध्ये वादाचा विषय नको म्हणून गृह मंत्रालयाने तातडीने हालचाली करून सीबीआय अहवाल मिळवला.