आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Cyclone Phailin Reach Odisha And Andhra Pradesh

महावादळ धडकले, वादळी वार्‍यांनी अनेक झाडे उन्मळून पडली; 5 लोकांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोपालपूर/ भुवनेश्वर/ नवी दिल्ली - आजवरचे सर्वांत भयंकर चक्रीवादळ ‘फायलिन’मुळे देशभर, विशेषत: किनारपट्टीवरील राज्यांत प्रचंड दहशत आहे. शनिवारी रात्री सुमारे 9 च्या सुमारास हे वादळ ओडिशातील गोपालपूरवर धडकले. या वादळी वार्‍यांनी अनेक झाडे उन्मळून पडली. काही कच्ची घरेही उद्ध्वस्त झाली. ओडिशात आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.
एनडीआरएफ, पोलिस आणि लष्कराने किनारपट्टीवर जोरदार बचाव मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत साडेपाच लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून गेल्या 23 वर्षांतील हे सर्वांत मोठे बचाव कार्य आहे. किनारपट्टीवर बहुतांश भागांत वीजपुरवठा बंद करण्यात आला असून वादळाचा पहिला तडाखा ओडिशातील सहा तर आंध्रातील तीन जिल्ह्यांना बसला आहे. अनेक झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांबही उखडले आहेत. वार्‍याचा वेग ताशी सुमारे 200 ते 240 किमी होता. सहा तास म्हणजे पहाटेपर्यंत वादळाचे रूप भयंकर होते. नंतर वार्‍यांचा वेग थोडा कमी झाला असला तरी पावसाने जोर पकडला आहे. भारतीय हवामान खातयाचे महासंचालक एल. एस. राठोड यांनी सांगितले, वादळ हळूहळू मंदावणार असले तरी त्याचा परिणाम किमान दोन-तीन दिवस जाणवेल. नंतरच नुकसानीचा अंदाज लागू शकणार आहे.

हवामान खात्याचे यश
भारतीय हवामान खात्याने अचूक अंदाज वर्तवल्याने हजारोंचे जीव वाचले. वादळ शनिवारी सहा ते सातच्या दरम्यान ओडिशातील गोपालपूरला पोहोचेल, हा अंदाजही तंतोतंत खरा ठरला.