आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marath Man Chooses 'mom' He Found On Facebook, Abandons Real Parents

FB वर भेटलेल्या महिलेला 'आई' मानून खर्‍या माता-पित्यांना सोडण्याचा मुलाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरेली (उत्तर प्रदेश) - इंटरनेट - सोशल नेटवर्किंग साइट्सवर मित्र- मैत्रिण भेटले, प्रियकर किंवा प्रियसी मिळाली अथवा इंटरनेटच्या माध्यामातून आयुष्याचा जोडीदार मिळाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका तरुणाला फेसबुकवर चक्क आई भेटली आहे आणि तिच्यासाठी तो खर्‍या आई-वडिलांना सोडण्याच्या तयारीत आहे. बरेली कॉलेजमधील पदवीच्या दुसर्‍या वर्षाला शिकत असलेल्या विजय मौर्यने केरळच्या एका महिलेला आई मानले आहे. तिच्यासाठी त्याने आई-वडिलांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबिय, मित्र, आप्तांनी लाख समजावूनही तो त्याचा निर्णय बदलण्यास तयार नाही.
काय आहे प्रकरण
विजय मौर्यची (वय 20 वर्षे) कथा फेसबुकपासून सुरु होते. त्याचे वडील ब्रिजेश मौर्य यांच्या म्हणण्यानुसार, 'तो कायम फेसबुकमध्ये डोके खूपसून बसल्याचे आम्ही अनेक दिवसांपासून पाहात होतो. मात्र, आम्ही ते गांभीर्याने घेतले नाही.' गेल्या महिन्यात तो घरातून निघून गेला होता. तेव्हा पोलिसात तक्रार दिली होती. या काळात त्याच्या बँक खात्यामध्ये हप्ताने 22 हजार रुपये जमा झाले होते. 28 दिवसांनंतर विजय घरी परत आला. त्याने सांगितले तो त्याची 'फेसबुक मॉम' सुकन्याला (नाव बदलले आहे) भेटण्यासाठी बहरीनला गेला होता. त्याने सांगितले, की सुकन्या नर्स असून ती मुळची केरळमधील त्रिवेंद्रम येथील आहे आणि कामानिमीत्त बहरीनमध्ये राहाते. त्याच्या बँक खात्यात तिनेच पैसे जमा केल्याचे त्याने सांगितले. त्याच्या पुढच्या वाक्याने आई-वडिलांना धक्काच बसला. त्याने सांगितले, की मी आता 'फेसबुक मॉम' सोबतच राहाणार आहे.
मुलाला घेण्यासाठी बरेलीत आली सुकन्या
विजय मौर्य आणि त्याच्या 'फेसबुक मॉम'च्या कथानकात खरे नाट्य तेव्हा निर्माण झाले जेव्हा सुकन्या 'मुलाला' घेण्यासाठी बरेलीत आली. शुक्रवारी 'आई' घरी आल्यानंतर विजयने तिला मिठी मारली आणि तिच्यासोबत जाण्यासाठी आग्रह धरला. फेसबुक मॉम स्वतः घ्यायला आल्यानंतर तो तिच्यासोबत जाण्यासाठी खर्‍या आई-वडिलांकडे विनंती करु लागला. तोपर्यंत हे प्रकरण पोलिसात गेले होते. पोलिस आणि विजयचे कुटुंबिय त्या दोघांनाही थांबवण्यात यशस्वी झाले आहेत. स्थानिक गुप्तचर संस्थेचे पोलिस अधिकारी एम.पी. सिंह म्हणाले, 'सध्या या प्रकरणाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.'
दरम्यान, विजयच्या कुटुंबियांना विश्वास आहे, की तो त्याचा निर्णय नक्की बदलेल. विजयचे वडील ब्रिजेश मौर्य म्हणाले, 'विजयला सध्या 20 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हे 20 दिवस तो आमच्यासोबत राहाणार आहे. त्यानंतर तो निर्णय घेईल की त्याला आमच्यासोबत राहायचे की सुकन्यासोबत जायचे.'
भाजपचे राजकारण
या नाट्यमय घडोमोडींमध्ये आणखी एक ट्विस्ट तेव्हा निर्माण झाले, जेव्हा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) स्थानिक नेते विजयच्या कुटुंबियांच्या बाजूने उभे राहिले. भाजप नेत्यांचे म्हणणे आहे, की एका ख्रिश्चन महिलेचे हे सुनियोजित षड्यंत्र आहे. हिंदू मुलाचे धर्म परिवर्तन करण्याचा हा प्रकार आहे.
(छायाचित्र - प्रतिकात्मक. याचा कोणत्याही व्यक्तीशी कसलाही संबंध नाही. )