जयपूर/रायपूर/नवी दिल्ली - नक्षलवादाचाबिमोड करण्यासाठी केंद्र सरकार सुरक्षा यंत्रणांना पूर्ण मोकळीक देणार काय, अशी विचारणा करत गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तसे संकेतच दिले आहेत. जयपूर पोलिस अकादमीच्या कार्यक्रमात राजनाथ म्हणाले की, यूपीत मुख्यमंत्री असताना अशी मोकळीक दिली होती. शिवाय मानवी हक्कवाल्यांची पर्वा करू नका असेही सांगितले होते. गृहमंत्री म्हणूनही तुमची हीच भूमिका आहे काय, असे पत्रकारांनी विचारले, तेव्हा ‘होय, आतादेखील मी तसेच करीन,’ असे सूचक वक्तव्य राजनाथ यांनी केले.
राजनाथ यांच्या या वक्तव्यावरून वादंग उठले आहे. सामाजिक संघटनांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. नक्षलींवर दहशतवाद्यांसारखी कारवाई करता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. गृहमंत्र्यांनी असे केल्यास नरसंहार होईल, असे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी म्हटले आहे. कायद्याची चौकट मोडून काम करण्याची भाषा धोकादायक आहे, असे काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले.